ऑक्सिजन टँकर व सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा: जिल्हाधिकारी मांढरे

नाशिक (प्रतिनिधी): कोरोना संसर्गाच्या रूग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन हा अत्यंत महत्वाचा घटक असल्याने तो रुग्णांना वेळेत मिळणे अत्यावश्यक आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात ऑक्सिजन टँकर व सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात येणार आहे, सदर वाहनांना रुग्णवाहिकेचे सर्व नियम लागू असतील, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात ऑक्सिजन पुरवठ्याबाबत संबंधित विभागांच्या झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी सूरज मांढरे बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखील सैंदाणे, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्त माधुरी पवार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतिश भामरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील नाशिक व मालेगाव महानगरपालिका, ग्रामीण भाग यांतील मोठ्या, मध्यम व लहान रुग्णालयात प्रतिदिवस सरासरी किती ऑक्सिजनची आवश्यकता आहे, याबाबत अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखील सैंदाणे यांनी प्रत्यक्ष वापराची माहिती घेऊन तांत्रिक माहिती बिनचूक रित्या संकलित करावी. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णालयांना आवश्यकतेनुसार ऑक्सिजनचा पुरवठा करणे सोयीचे होईल. जिल्ह्यातील उपलब्ध ऑक्सिजनचा पुरवठा सर्व रुग्णांना योग्य प्रकारे होईल व त्यामध्ये कोणत्याही प्रकारे हयगय होणार नाही याची दररोज खात्री करावी व दैनंदिन अहवाल आपत्कालीन कार्य केंद्राला पाठवावा असेही निर्देश यावेळी जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिले.

आपल्या जिल्ह्यातील वैद्यकिय क्षेत्राची ऑक्सिजनची मागणी पूर्ण करून घेण्याची जबाबदारी महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र यांची राहील. ऑक्सिजन तयार करणाऱ्या उद्योगांवर लक्ष ठेवण्यासाठी पथके तयार करण्यात यावीत. त्याचप्रमाणे ज्या उद्योगांच्या ऑक्सिजन वापरावर निर्बंध घालण्यात आलेली आहेत अशा उद्योगांकडे परस्पर ऑक्सिजनचा पुरवठा होणार नाही याची सतत पडताळणी करीत राहावी अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यात उपलब्ध ऑक्सिजनसाठा किती आहे, तसेच ऑक्सिजनची उपलब्धता वाढविण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न याबाबत अन्न व औषध विभागाच्या सहायक आयुक्त माधुरी पवार यांनी बैठकीत माहिती दिली. सद्य:स्थितीमध्ये जिल्ह्यामध्ये पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध असून त्याचा पुरवठा सर्व रुग्णालयांना योग्यप्रकारे करण्यात येत असल्याची शहानिशा अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त श्रीमती माधुरी पवार यांनी करावी व तसा दैनंदिन अहवाल आपत्कालीन कार्य केंद्राकडे द्यावा.

एकंदरीत ऑक्सिजनचा पुरवठा वैद्यकीय औद्योगिक वापरामध्ये समन्वय तसेच टँकर अथवा ऑक्सीजन सिलेंडर वाहून येणाऱ्या वाहनांची सुलभ वाहतुक या सर्व बाबींचे संनियंत्रण निवासी उपजिल्हाधिकारी सह आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांची समिती अत्यंत बारकाईने करेल अशा सूचना जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिल्या.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790