अमळनेरच्या प्रसिद्ध मंगळग्रह मंदिरात भाविकांसाठी ड्रेसकोड; असभ्य कपडे घालण्यास बंदी

नाशिक (प्रतिनिधी): एकीकडे राज्यातील मंदिरप्रवेशावरून वाद सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरण चांगलेच गाजले. त्यानंतर तुळजापूर मंदिर बाहेर प्रवेशासाठी नियमावलीचा फलक लावण्यात आल्याने खळबळ उडाली होती.

आता प्रसिद्ध अमळनेर येथील मंगळग्रह मंदिराबाहेर अशाच पद्धतीचा फलक चर्चेत असून तो सहा महिन्यापूर्वी लावण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मंदिर प्रवेशाचा प्रश्न चांगलाच गाजत आहे. नुकताच त्र्यंबकेश्वर येथील मंदिर प्रकरणावरून चांगलाच वाद रंगल्याचे दिसून आले. तो वाद मिटत नाही तोच तुळजापूर देवी मंदिराबाहेर प्रवेश नियमावलीचा फलक लावण्यात आला.

यात उत्तेजक कपडे, तोकडे कपडे परिधान करून नये, अंग प्रदर्शन करून नये, भारतीय संस्कृती जपावी अशा आशयाचा फलक लावण्यात आला होता, मात्र 24 तासांत प्रशासनाने हा फलक काढून टाकण्याचे आदेश दिले. मात्र आता जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील मंगळग्रह मंदिराबाहेर अशाच आशयाचा फलक दिसून येत आहे. भाविकांसाठी लावण्यात आलेल्या उत्तेजक कपडे, तोकडे कपडे परिधान करून नये, अंग प्रदर्शन करून नये, भारतीय संस्कृती जपावी असाच फलक लावण्यात आल्यामुळे चर्चेचा विषय बनला आहे.

मंदिराचे ट्रस्टी दिगंबर महाले म्हणाले:
दरम्यान, फलक लावण्याच्या विषयावर मंदिराचे ट्रस्टी दिगंबर महाले यांनी बोलताना म्हटल आहे की, राज्यात अशा प्रकारचे फलक हा पहिल्यांदा मंगळग्रह या मंदिरावर लावण्यात आला. त्यांनतर इतरांनी त्याच अनुकरण केलं. प्रत्येक देशाची एक संस्कृती आहे, त्याच प्रमाणे आपली सुद्धा संस्कृती आहे, कुणी कसेही कपडे  घालावे, त्याला विरोध नाही. मात्र मंदिरात तोकडे, उत्तेजक तसेच अंगप्रदर्शन करणारे कपडे घालण्यास आमचा विरोध आहे.

त्यासाठी आम्ही तो नियम केला असून हा फलक लावला असल्याचं दिगंबर महाले यांनी म्हटलं आहे. फॅशनच्या विरोधात नाही, कुणाच्याही व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातलेला नाही,  शाळेत मुलांना ड्रेस कोड असतो. त्यावर आपण काही बोलत नाही, कारण तो त्यांचा नियम आहे, त्याच प्रमाणे मंगळग्रह मंदिर याठिकाणी भारतीय संस्कृती जपण्यासाठी हा नियम आम्ही केला असून याठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला तो पाळावाच लागेल, असं सुद्धा महाले यांनी म्हटलं आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790