शिर्डी विमानतळावरून कार्गो सेवेस मिळाली मंजुरी

नगर, नाशिकसह मराठवाड्यातील शेतीमाल व इतर उत्पादनांना होणार फायदा

नाशिक (प्रतिनिधी): येथील साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कार्गो सेवेसाठी (मालवाहतूक) केंद्रीय नागरी उड्डाण विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे नाशिक, नगरसह मराठवाड्यातील उद्योग आणि शेतीमालाच्या हवाई वाहतुकीसाठी या सेवेचा मोठा फायदा होणार आहे.

साईबाबा समाधी शताब्दीच्या प्रारंभाला शिर्डीत देशांतर्गत विमानसेवेचा शुभारंभ करण्यात आल्यानंतर राज्यात मुंबई, पुणे, नागपूरनंतर सर्वाधिक प्रवासी संख्या शिर्डी विमानतळाची आहे. येथून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याबाबतची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. मुंबई, चेन्नई, हैदराबाद, दिल्ली, इंदूर, बंगळुरू या महत्त्वाच्या ठिकाणांसाठीही येथून उड्डाणे होत आहेत. नगर, नाशिकसह मराठवाड्यातील उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी व शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी शिर्डीतून कार्गो सेवा सुरू करण्याची मागणी सर्वच स्तरांतून होत होती.
दक्षिण नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केंद्रीयपातळीवर त्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.
नगर जिल्ह्यातील डाळिंब, भाजीपाला, नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना तसेच नाशिक, सिन्नर, नगर, औरंगाबादमधील उद्योगांना शिर्डीतून सुरू होणाऱ्या कार्गो सेवेचा मोठा फायदा होणार अाहे. शिर्डीसह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उद्योग-व्यवसायवाढीलाही या निर्णयामुळे चालना मिळू शकेल.