लॉन्स व मंगल कार्यालयांच्या संचालकांना सीसीटीव्ही बसवून घेण्याच्या सूचना

नाशिक (प्रतिनिधी): लग्नसमारंभांमध्ये होणाऱ्या संभाव्य चोऱ्या लक्षात घेता सर्व लॉन्स व मंगल कार्यालयांच्या संचालकांना प्रशासनाकडून सीसीटीव्ही बसवून घेण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.

शहरात रोज छोट्या मोठ्या चोऱ्या झाल्याचे कानावर येत असते. पैसे, दागिने किंवा गाड्या चोरीला जाणे हे रोजचेच झाले आहे. यामुळे लोकं व प्रशासन पार कंटाळून गेले आहे. सध्या तर लग्न व समारंभाचे दिवस असल्याने हे प्रकार अजूनच वाढले आहेत. या सगळ्या प्रकारांना आळा घालण्यासाठी लग्न कार्यालये चालवणाऱ्या संचालकांनी चांगल्या दर्जाचे सीसीटीव्ही बसवून घ्यावे असे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सांगितले आहे.

यामुळे लग्नातून वस्तू, दागिने किंवा पैसे चोरीला गेल्यास चोरी करणाऱ्या व्यक्तींचा  चेहरा दिसून त्यांना सहज पकडता येईल व काही प्रमाणात का होईना गुन्ह्यांना आळा बसेल असेही त्यांनी सांगितले. अलीकडेच लग्न समारंभ सुरु असतांना चोरीचे प्रकार घडले. यामुळे ज्यांचे दागिने व पैसे चोरीला गेले त्यांना मनस्ताप सहन करावा लागला. याच विषयाची गांभीर्यता लक्षात घेऊन इंदिरा नगर भागातील मंगल कार्यालयांच्या  संचालकांची बैठक घेऊन त्यांना योग्य ती खबरदारी घेण्याचे प्रशासनाने सूचना दिल्या. व काय काय उपायोजना केल्या पाहिजे हेही सांगितले.