नाशिक महानगरपालिका ९० हजार रॅपिड टेस्टिंग किट खरेदी करणार !

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिकेच्या नवीन बिटको रुग्णालयाची पाहणी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांच्या समवेत मनपा पदाधिकाऱ्यांनी केली. नाशिकरोड येथील बिटको हॉस्पिटल मधील उपलब्ध सुविधा व त्या ठिकाणी असणारी साधनसामग्रीची माहिती या पाहणीच्या वेळी घेण्यात आली. तसेच रुग्णांची भोजन व्यवस्था, औषध पुरवठा व ऑक्सिजनचा पुरवठा या बाबत कमतरता भासू नये याबाबत दखल घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

याठिकाणी उपलब्ध औषधसाठा याची माहिती करून घेऊन पुढे किती औषधांची आवश्यकता आहे त्याबाबतचा आढावा घेण्यात आला व आवश्यकतेनुसार खरेदी करण्याच्या सुचना देण्यात आल्या. मनपाचे डॉ.झाकीर हुसेन हॉस्पिटल तसेच सातपूर,सिडको,पंचवटी  या भागातील रुग्णालयांना देखील लवकरच भेट देऊन त्यांच्या असणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्याठिकाणी पूर्तता करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येणार असल्याचे स्थायी  समिती सभापती गणेश गीते यांनी सांगितले. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यादृष्टीने महापालिका प्रशासनाच्या स्तरावर विविध उपाययोजना करीत आहे. कोरोना च्या तपासण्या वाढविण्याचा दृष्टीने मनपाने १० हजार रॅपिड टेस्टिंग किट खरेदी केले असून नव्याने ९० हजार रॅपिड टेस्टिंग किट खरेदी करण्याबाबत उपायोजना करून शहरातील ६ विभागात तपासणी करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहेत. ज्यामुळे विकेंद्रीकरण होऊन जास्तीत जास्त तपासण्या होण्यास मदत होईल. संस्थेला पत्र देऊन जास्तीत जास्त डॉक्टरांनी वैद्यकीय सेवा द्यावी असे आवाहन एक बैठक घेऊन करण्यात येणार आहे. मनपा मध्ये मानधन किंवा स्वयंस्फूर्तीने सेवा देण्याच्या दृष्टीने त्या बैठकीत आवाहन केले जाणार आहे. मनपा प्रशासनाच्या वतीने विविध हॉस्पिटलमध्ये रुग्णांची सेवा करण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी डॉक्टर,स्टाफ नर्स,आया,वार्ड बॉय तसेच रुग्णालय संदर्भातील इतर कर्मचारी वर्ग यांची संख्या अपूर्ण असून त्या रिक्त जागा भरण्याच्या दृष्टीने प्रशासनाला सूचना देण्यात येणार आहेत शहरातील रुग्णांना औषधांचा तुटवडा जाणवू नये यादृष्टीने औषध खरेदी करण्यासाठी स्थायी समिती ची विशेष सभा बोलावून त्यात मान्यता देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे.

हे ही वाचा:  नाशिक: उज्जैनहून येत असतांना नाशिकच्या उद्योजकाच्या कारचा अपघात; पत्नी ठार तर तीन जण जखमी

बिटको हॉस्पिटल मध्ये येत्या १० दिवसात ५० बेडची व्यवस्था करून पुढील १ महिन्यात हे हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने काही अडचण निर्माण होत असल्यास स्थायी समिती च्या वतीने सर्व खाते प्रमुख यांची नियोजन करण्यासंदर्भात लवकरच बैठक घेतली जाणार आहे. या पाहणीच्या वेळी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांच्या समवेत सभागृहनेते सतीश सोनवणे,नगरसेवक रमेश धोंगडे, सूर्यकांत लवटे डॉ. जितेंद्र धनेश्वर, कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी, उपअभियंता निलेश साळी, एस.आय. कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790