चिमुकल्यांचा छळ करणाऱ्या निर्दयी पोलीस बापासह आईला अटक

नाशिक (प्रतिनिधी) : पोटच्या पोरांना जरा ही काही दुखापत झाली तर आई-वडिलांचा जीव कासावीस होतो. मात्र, या घटनेत पित्याने व सावत्र आईने ५ व ८ वर्षाच्या स्वतःच्या लेकरांना अमानुष मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, संशयित राहुल विजय मोरे हा इगतपुरी लोहमार्ग पोलीस कर्मचारी आहे. तर संशयित दुसरी पत्नी मयुरी व पहिल्या पत्नीपासून झालेल्या ८ वर्षाचा मुलगा साहील व ५ वर्षाची मुलगी प्रिया यांच्यासह तळेगाव येथील चंद्रभागा अपार्टमेंटमध्ये राहतो. काही महिन्यांपूर्वी संशयिताच्या पत्नीचा मृत्यू झाला म्हणून, त्याने दुसरे लग्न केले. मात्र, संशयिताला आपल्या २ लेकरांची संसारात अडचण वाटू लागल्याने तो त्यांना नियमित मारहाण व मानसिक छळ करत होता.

दरम्यान, शुक्रवारी (दि.१५ जानेवारी) रोजी संशयिताने दोघ लेकरांना चामडी बेल्टने बेदम मारहाण केली. यामध्ये प्रियाचा चेहरा सुजला व डोळ्याखाली जखमा झाल्या तर, साहीलच्या पाठीवर बेल्टने मारल्याने वळ उमटले. या प्रकाराची माहिती मुलांच्या आजोळी कळल्यावर त्यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात तक्रार केली असता, संशयित व त्याच्या पत्नीस पोलिसांनी लागलीच अटक केली. तर, दोन्ही मुलांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे.