नाशिककरांनो मास्क घाला अन्यथा कारवाईला सामोरे जा – पोलीस आयुक्तांचे आदेश !

नाशिक: नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी, सर्व नागरिकांना मास्क घालण्याबाबत आदेश जारी केले आहेत, तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाईही करण्यात येणार आहे.

७ एप्रिल २०२० रोजी महाराष्ट्र एक्सप्रेस ग्रुपचे संपादक मंदार देशपांडे यांनीही नाशिक कॉलिंगवर एक लाईव्ह व्हिडीओ केला होता. यात विनाकारण बाहेर फिरणारे लोक तसेच मास्क न घालता फिरणारे लोक यांचा मुद्दा उपस्थित केला होता. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क घालणे हे गरजेचे आहे, असेही यात सांगण्यात आले होते. मास्क न घालता फिरणार्या लोकांचा या व्हिडीओत “सुशिक्षित अडाणी” असा उल्लेख करण्यात आला होता.

त्यानंतर काल (दि.८ एप्रिल २०२०) रोजी, नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सर्व नागरिकांना मास्क घालणे अनिवार्य असल्याचा आदेश काढला आहे. खरं तर हा आदेश पोलीस आयुक्तांना काढावा लागणं हे दुर्दैवच म्हणावं लागेल, प्रत्येक नागरिकाने जबाबदारपणे वागून वेळोवेळी मास्कचा वापर केला असता तर हे आदेश काढावेच लागले नसते. असो, आता तरी नागरिकांना आवाहन आहे, की प्रत्येक वेळी मास्कचा वापर करा.

पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे हे मास्क मानांकित प्रतीचे अथवा घरगुती पद्धतीने तयार केलेले व योग्य पद्धतीने स्वच्ह व निर्जंतुक करून पुन्हा वापरता येण्याजोगे असणे आवश्यक आहे. या निर्देशांचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता १८८, साथरोग अधिनियम १८९७ मधील तरतुदी व प्रचलित कायद्यान्वये शिक्षेस पात्र राहील !