नाशिकपासून १५ कि.मी.वरील शाळा १५ मार्चपर्यंत बंद

दहावी, बारावीचे गणित, विज्ञान व इंग्रजीचे शिक्षण ऑफलाइन मात्र पालकांची संमती आवश्यक

नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेपाठोपाठ शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावरील जिल्हा परिषदेसह खासगी शाळा शुक्रवारपासून (दि. ५) १५ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेवरून जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे

शहरात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी पुन्हा निर्बंध लागू केले जात आहेत. त्यामुळे लग्नसोहळ्यांच्या उपस्थितीवर निर्बंध आणण्यात आले आहेत. विवाह सोहळ्यात ५० पेक्षा जास्त गर्दी असू नये यासाठी लॉन्स व मंगल कार्यालय चालकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने नोटीस बजावण्यात आल्या आहेत. महानगरपालिका हद्दीतील शाळा १५ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय आयुक्त कैलास जाधव यांनी घेतला आहे त्यामुळे शहरातील पाचवी ते नववी व अकरावीचे वर्ग बंद करण्यात आले आहेत.

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान व इंग्रजी विषयाचे शिक्षण ऑफलाइन पद्धतीने देता येईल, मात्र त्यासाठी पालकांची परवानगी आवश्यक असणार आहे महापालिकेपाठोपाठ जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून महापालिकेच्या १५ किलोमीटर परिघातील जिल्हा परिषदेसह खासगी शाळाही याचप्रमाणे १५ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे सद्यस्थितीत गुरुवारी रात्री ८ वाजेपर्यंत मनपा हद्दीत २५०८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू होते. नागरिकांनी मास्क व फीजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या सीईओ लीना बनसोड यांनी केले आहे