नाशिक (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून खासगी रुग्णालयांकडून कोरोनाबाधित रुग्णांची लुट होत असल्याचे प्रकार समोर आले होते. त्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली. त्यानंतर आता महापालिकेच्या वतीने खासगी रुग्णालयांना काही सूचनांचे सक्तीने पालन करण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांना कोरोना रुग्णाच्या उपचाराची फीस समजावी तसेच संबंधित हॉस्पिटल मध्ये कोविड रुग्णासाठी किती बेड शिल्लक आहेत हे समजण्यासाठी खासगी हॉस्पिटल्सच्या बाहेर दरपत्रक लावणे अनिवार्य केले आहे.
याशिवाय कोरोना रुग्णांच्या उपचाराचे दर हे शासनाच्या निर्देशानुसारच आकारले जावे असेही आदेश देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त शहरातील सर्वच रुग्णालयांना भेट देऊन मनपाचे कर्मचारी दररोज १० ते २० बिले ताब्यात घेऊन आकारलेल्या दराची तपासणी करत आहेत.