रेमडेसिविरचा काळा बाजार: कंपनीचा एमआरच मुख्य सूत्रधार, आणखी चौघा जणांना अटक

नाशिक (प्रतिनिधी): महामार्ग परिसरात रेमडेसिविरची काळ्या बाजारात अव्वाच्या सव्वा किमतीने विक्री करणाऱ्या दोन महिलांसह टोळीचे कनेक्शन थेट वसई- विरारपर्यंत असून रेमडेसिविर बनविणाऱ्या कंपनीचा एम.आर. हाच मुख्य सूत्रधार असल्याचे चौकशीत पुढे आले आहे.

दरम्यान, या प्रकरणी आता सुनील गुप्ता, महेश पाटील (दोघे रा. पालघर), अभिषेक शेलार (वाडा), रोहित मुठाळ (नाशिक) या चौघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून २० रेमडेसिविरही जप्त करण्यात आले आहेत. महामार्ग परिसरात दोन महिलांना दोन रेमडेसिविर ५४ हजारांना विक्री करताना अन्न व औ षध प्रशासन आणि आडगाव पोलिसांच्या पथकाने रंगेहाथ अटक केली होती. चौकशीत ऋती रत्नाकर उबाळे, जागृती शरद शार्दुल, स्नेहल अनिल पगारे, कामेश रवींद्र बच्छाव या संशयितांची नावे निष्पन्न झाले.

संशयितांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते. हे रेमडेसिविर पालघर येथून आणल्याची त्यांनी कबुली दिली होती. आडगाव पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोधपथकाने संशयितांचा माग काढला. पालघर येथून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत वाडा येथील एक आणि नाशिक येथील एकाचे नाव निष्पन्न झाले. पथकाने चौघांना अटक केली. वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख, हेमंत तोडकर, राजेंद्र कपले, सुरेश नरवडे, विजयकुमार सूर्यवंशी, दशरथ पागी, सचिन बाहीकर, वैभव परदेशी, विश्वास साबळे, देवानंद मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आठ संशयितांना १९ पर्यंत कोठडी
संशयितांच्या चौकशीत वसई-विरार परिसरात एका औषधनिर्माण कंपनीचा एमआर हा रेमडेसिविरचा काळा बाजार करत असल्याची माहिती मिळाली. पथक संशयितांच्या मागावर आहे. या टोळीने आजपर्यंत किती रेमडेसिविर कुठल्या दवाखान्यात अथवा रुग्णांच्या नातेवाइकांना विक्री केले याचा खुलासा होणार आहे. या टोळीतील आठ संशयितांना दि.१९ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.