गॅस गळतीमुळे हॉटेलच्या किचनमध्ये रात्रीच्या वेळी स्फोट, स्वयंपाक्याचा मृत्यू

गॅस गळतीमुळे हॉटेलच्या किचनमध्ये रात्रीच्या वेळी स्फोट, स्वयंपाक्याचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात हॉटेल रामा हेरिटेज येथील स्वयंपाक्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी (दि. ३) रात्री ही घटना घडली. यानंतर शनिवारी दिवसभर मृताच्या नातेवाइकांकडून हॉटेलमध्ये गोंधळ घालत भरपाईची मागणी करत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर दुपारी मृतदेह ताब्यात घेण्यात आला.

याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेत रूपेश रामदास गायकवाड (४५) याचा मृत्यू झाला. यामागे घातपात असल्याचा आरोप त्याच्या नातलगांनी केला होता. त्यामुळे तणावाचे वातावरण पसरले होते. दरम्यान, जुन्या मुंबई-अाग्रारोडवरील हॉटेल रामा हेरिटेज येथे रात्री ११.३० च्या सुमारास गॅस गळतीमुळे स्फोट झाला. यात हॉटेलमधील स्वयंपाकी रूपेश गायकवाड याचा मृत्यू झाला.

रूपेश यांच्या नातलगांनी घा’त’पा’ता’मुळे रूपेश यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. घटना घडल्यानंतर आम्हाला मध्यरात्री कळविण्यात आले. तोपर्यंत माहिती लपवण्यात आली. रूपेश हे त्यांच्या कुटुंबातील कर्ता पुरुष असल्याचे नातलगांनी सांगितले. त्यामुळे कुटुंबियांना नुकसानभरपाई देण्याची मागणी नातलगांनी केली. यावेळी हॉटेल परिसरात नातलगांनी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच मुंबईनाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच हॉटेलमधील सीसीटीव्हीची पाहणी केली. स्टोअर रूममध्ये रूपेश गायकवाड गॅस सिलिंडर नेत होते. तेथील दिवा लावल्यानंतर स्फोट झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे गॅस गळती होऊन हा स्फोट झाला व त्यात रूपेश यांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस तपास करीत आहेत.