विद्यार्थ्यांनी बहरणार शाळा; या तारखेपासून सुरू होणार ५ वी ते ८ वी चे वर्ग !

नाशिक (प्रतिनिधी) : नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले असून, नियमांचे पालन होतांना दिसून येत आहे. त्यामुळे पाचवी ते आठवीचे वर्ग देखील सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार महापालिकेकडून नियोजन सुरू आहे. २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचे महापालिकेने नियोजन केले आहे.

त्यानुसार, ४०५ शाळांमध्ये २ हजार ६०२ शिक्षक  हे १ लाख १० हजार ७७३ विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांना दिवसाआड पद्धतीने शिक्षण दिले जाणार आहे. तर दुसऱ्या बाजूला शिक्षक व शिपाई क्लार्क इत्यादींची शाळेत प्रवेश करण्यापूर्वी कोरोना चाचणी केली जाणार आहे. याबाबत आरोग्य विभागाच्या मदतीने तयारी सुरू केली आहे. नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे काटेकोर पालन होताना दिसते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होतांना दिसून येत नाही. म्हणून, शासनाने २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवी हे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, काही नियम शासनाने जारी केले आहेत.

त्यामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करावेच लागणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना महिन्यातून सुट्ट्या वगळता १० ते १२ दिवसच शिक्षण मिळणार आहे. तर, यात‌ देखील गणित, विज्ञान व इंग्रजी या तीन विषयांना शिकवण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. तर, शाळांमध्ये पाठवण्यासाठी पालकांची परवानगी तसेच संमतीपत्र अनिवार्य आहे. तसेच शाळांमध्ये सॅनिटायझर व मास्क बंधनकारक असणार आहे.