मालेगाव: नागरिकांनी आजार, लक्षणे लपवू नये – इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर प्रमुख डॉ. आशिया

मालेगाव, दि. 22 (प्रतिनिधी) : कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनामार्फत यापूर्वीच सर्वेक्षणासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही पथके घरोघरी जावून तालुक्यातील प्रत्येक नागरिकाचे सर्वेक्षण करीत आहेत. यासाठी चांदवड, देवळा, निफाड, नांदगाव, सटाणा व येवला येथील 40 अधिकारी व कर्मचारी यांची सेवा अधिग्रहीत करण्यात आली आहे. त्यांच्यावर घरोघरी जावून संशयित रुग्णांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती घटना व्यवस्थापक तथा इम/र्जन्सी ऑपरेशन सेंटरचे प्रमुख डॉ. पंकज आशिया यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी लगतच्या तालुक्यातील आरोग्य प्रशासनातील वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, परिचारिका अशा पदावर कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांची सेवा अधिग्रहीत करण्याच्या दिलेल्या सुचनेनुसार या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामुळे सर्वेक्षणाच्या कामाला निश्चित गती मिळणार आहे. संपूर्ण मालेगाव शहर लवकरात लवकर कोरोनामुक्त करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सर्वेक्षणासाठी येणाऱ्या पथकांना सहकार्य करावे, त्याच बरोबर आपल्यात दिसणाऱ्या कुठल्याही आजाराची लक्षणे लपवू नयेत. बाधित रुग्णाला वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्ण अत्यवस्थ होतो, त्यानंतर त्याचा जीव वाचविणे अवघड होते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपली कौटुबिक व सामाजिक जबाबदारीचे भान ठेवावे व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही डॉ.आशिया यांनी केले आहे.