त्या चिमुरडीला पळवून नेणाऱ्याला अटक; हे सांगितले कारण…

नाशिक (प्रतिनिधी): काही दिवसांपूर्वी सिव्हील हॉस्पिटलमधून पळवून नेलेली बालिका मंगळवारी सापडली, सोबतच अपहरणकर्त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. आपल्या मुलीचा मृत्यु झाल्याने आपल्याला कुणाचा तरी आधार मिळावा याकरीता या बालिकेला उचलून नेल्याची कबुली अपहरणकर्त्याने पोलिसांना दिली आहे.

माणिक सुरेश काळे असे या संशयित आरोपीचे नाव आहे. संशयित आरोपी हा फुलेनगर शनी मंदिर येथे राहणारा असून त्याने दोन दिवसांपूर्वी जिल्हा रूग्णालयातून दिड वर्षाच्या बालिकेचे अपहरण केले होते. या घटनेनंतर मुलीला गमावलेल्या आईने अन्नपाणी सोडले होते. तीन दिवस उलटूनही अपहरण झालेल्या या चिमुकलीचा शोध न लागल्याने ही माता रडून रडून बेहाल झाली. सरकारवाडा पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवत संशयिताचा शोध सुरू केला अखेर ही बालिका आज पोलिसांना मिळून आली.

त्यानंतर काही तासांतच अपहरणकर्त्यालाही पकडण्यात पोलिसांना यश आले. माणिक काळे असे या संशयिताचे नाव असून काही दिवसांपूर्वी माणिक काळेच्या मुलीचा मृत्यू झाला होता. मुलीचा मृत्यू झाल्यामुळे माणिक काळेवर दुखाचा डोंगर कोसळला होता. नैराश्याने घेरलेल्या माणिक ला आपल्याला आता आधार कुणीच नाही, अशी भावना निर्माण झाली होती. आपल्याला कुणी तरी आधार मिळावे म्हणून माणिकने बालिकेला उचलून नेल्याचे सांगितले.