‘या’ कारणामुळे जिल्ह्यातील एक लाख रेशनधारकांचे धान्य बंद

नाशिक (प्रतिनिधी): रेशनपात्र लाभार्थींचा शोध घेऊन त्यांना धान्य देण्याची प्रक्रिया एका बाजूने सुरू असताना आता दुसऱ्या बाजूने बोगस रेशनकार्ड धारकांचाही शोध यंत्रणेकडून सुरूच आहे. अशातच आता रेशनकार्डला आधारची जोडणी न केलेल्या तब्बल १ लाख नागरिकांचे धान्यच चालू महिन्यांपासून बंद झाले आहे. जोपर्यंत आधार लिंक केले जात नाही, तोपर्यंत त्यांना धान्य दिले जाणार नसल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांनी सांगितले आहे.

रेशनमधील काळाबाजार बंद करण्यासह वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाकडून बायोमेट्रिक प्रणाली विकसित करण्यात आली. त्यात ऑनलाइन धान्य वितरणाची व्यवस्थाही झाली. यामध्ये प्रत्येक जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी त्यांना दरमहा आवश्यक धान्य शासनास कळविणे आवश्यक आहे. हे ऑनलाइन असल्याने किती धान्याची उचल आणि वितरण झाले हे देखील या एईपीडीएस प्रणालीद्वारे दिसून येते. शिवाय कुठल्या तालुक्याला किती धान्य हवे, त्यांना किती दिले, त्यांनी दुकानदारांना किती वितरित केले याचीही माहिती ऑनलाइन दिसते. शिवाय दुकानदारांकडे किती कार्डधारक आहेत.

त्यानुसार किती धान्याची मागणी आहे, किती दिले अन् किती दुकानदारांनी संबंधित कार्डधारकांना वितरीत केले. त्यांच्याकडे किती धान्य शिल्लक आहे. याची संपूर्ण माहितीच ऑनलाइन दिसते. आता त्याच्या पुढे जाऊन प्रत्येक कार्डावरील व्यक्तीचे आधार लिंक करण्याची प्रक्रिया सुरु आहे. फेब्रुवारीपर्यंत त्याची मुदत होती.

त्यानुसार जिल्ह्यातील जवळपास १ लाखावर नागरिकांचे आधार कार्ड लिंक झाले नाही. त्यामुळे या नागरिकांना त्यांच्या हिश्श्याचे मार्च महिन्यातील धान्य दिले जाणार नाही. शिवाय त्यांना आधार जोडणी करणे बंधनकारक आहे.