नाशिक शहरातील २२ रुग्णालयांची मान्यता रद्द करण्याच्या हालचाली…

नाशिक शहरातील २२ रुग्णालयांची मान्यता रद्द करण्याच्या हालचाली…

नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाकाळात रुग्णांचे अव्वाच्या सव्वा बिले आकारणी केल्याच्या तक्रारी लक्षात घेत प्रत्येक बिलाची पुनर्तपासणी करण्याच्या दृष्टीने पुन्हा कागदपत्रे पाठविण्याचे वारंवार आवाहन करूनही प्रतिसाद मिळत नसल्याचे बघून महापालिकेने २२ खासगी रुग्णालयांना अंतिम नोटीस पाठवली आहे. त्यात, तीन दिवसांत कागदपत्रे सादर न केल्यास रुग्णालयांची मान्यता रद्द करण्याचा इशारा दिला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शासननियमांचे उल्लंघन करीत बिल आकारणीच्या तक्रारी वाढल्या होत्या. शासननियमानुसारविशेष कोविड रुग्णालयातील ८० टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश होते. या बेडवर उपचार घेणाऱ्यांकडून किती रुपये घेतले पाहिजे याचेही दरपत्रक दिले होते. हे दरपत्रक खासगी रुग्णालयांनी दर्शनी भागात लावण्याच्या सूचना होत्या. मात्र, त्यात कसूर होत असल्यामुळे रुग्णालयांना नोटिसाही दिल्या गेल्या.

मात्र, त्यास काही रुग्णालयांनी हरताळ फासल्यानंतर पालिकेने कारवाईसाठी आक्रमक पवित्रा घेतला. प्रत्यक्षात त्यांना कारवाई करण्यात अडचणी येत होत्या. कोरोनामुळे हॉस्पिटलवर कारवाई झाल्यास वैद्यकीय अधिकारी आंदोलन करतील अशीही भीती होती. त्यामुळे पालिकेने कोरोनाची दुसरी लाट गेल्यानंतर कारवाईचे नियोजन केले. त्यानुसार पालिकेने लेखापरीक्षण विभागामार्फत बेडची संख्या व त्या प्रमाणात किती रुग्णांनी उपचार घेतले याचा हिशोब मागितल्यानंतर शहरातील दोन बड्या कॉर्पोरेट रुग्णालयांकडून तफावत आढळली.

अशीच तफावत आढळल्यामुळे तब्बल ५३ खासगी रुग्णालयांना नोटिसा बजावल्या होत्या. मार्च ते मे या महिन्यात रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या ८० टक्के व २० टक्के बेडवरील सर्व रुग्णांची देयके, दिवसानिहाय अॅडमिशन व डिस्चार्जची यादीही सादर करण्याचे स्पष्ट केले होते. ५३ पैकी ३१ खासगी रुग्णालयांनी आपली माहिती सादर केली असून २२ खासगी रुग्णालयांनी महापालिकेच्या या नोटिसीला उत्तर देण्यास नकार दिला. त्यामुळे महापालिकेने या खासगी रुग्णालयांवर कारवाई करण्याची तयारी सुरू केली असून अंतिम नोटीस बजावत तीन दिवसांत कागदपत्रे द्या, अन्यथा मान्यता रद्द करण्यात येईल, असाही इशाराही दिला आहे.