कोविड १९ साठी कामावर हजर न झालेल्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे नोंदविण्याचे आदेश

नाशिक (प्रतिनिधी): कोरोना (कोविड-१९) च्या कामकाजासाठी नाशिक महानगरपालिकेच्या वतीने विविध पदावर मानधनावर नियुक्ती दिलेले जे कर्मचारी अद्याप हजर झाले नाही त्याच्यावर मेस्मा अंतर्गत कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्याचे निर्देश आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विभागास दिले आहेत.

कोरोना (कोविड-१९) च्या कामकाजासाठी नाशिक महानगरपालिकेच्या वतीने फिजिशियन, भूलतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, मानसोपचार तज्ञ,आहारतज्ञ,समुपदेशक, मल्टी हेल्थ वर्कर, मायक्रो बायोलॉजी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, मिश्रक, रेडिओग्राफर या विविध पदांसाठी वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करून थेट मुलाखतीद्वारे मानधनावर घेण्याच्या दृष्टीने भरती प्रक्रिया राबवली होती. या थेट मुलाखतीद्वारे ज्यांची निवड झाली त्या सर्वांना नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत.त्यातील जे पात्र असे उमेदवार रुजू झाले नाहीत त्यातील ७० जणांना नोटीसा देण्यात आल्या होत्या. मात्र ते अद्यापही हजर न झाल्याने त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. तसेच याच निवड प्रक्रियेतील २०० उमेदवार हजर झालेले नसून या सर्वांना मेस्मा अंतर्गत नोटीसा देण्यात येणार असून हे उमेदवार हजर न झाल्यास मनपाच्या वतीने कठोर पावले उचलून गुन्हे नोंदविणेची कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विभागास दिले आहेत.