सामान्यांच्या खिशाला कात्री: अखेर नाशिकमध्येही डिझेल आणि पेट्रोलचे दर इतके वाढले !
नाशिक (प्रतिनिधी): अखेर तीन दिवसांनंतर पुन्हा इंधनाचे दर वाढले असून त्यामुळे नाशिकमध्येही डिझेलचे दर शंभरीपार पोहोचले आहेत. इंधन दराचा हा आजपर्यंतचा उच्चांक आहे.
११ ऑक्टोबरपासून १३ ऑक्टोबरपर्यंत म्हणजे तीन दिवस तेल कंपन्यांनी इंधनाचे दर स्थिर ठेवले होते.
दर कमी होण्याची अपेक्षा जनतेकडून व्यक्त होत असतानाच कंपन्यांनी १४ ऑक्टोबरला डिझेलचे दर ३६ पैसे तर पेट्रोलचे दर ३३ पैशांनी वाढविले. यामुळे परभणीपाठोपाठ आता नाशिकमध्येही डीझेलचे दर १००.२७ रुपयांवर तर प्रेत्रोलचे दर १११.१८ रुपये प्रतिलिटरवर जाऊन पोहोचले आहेत.
आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर वाढत असून कच्च्या तेलाच्या बॅरलचा दर ७९ डॉलरच्या जवळपास आहेत. तेल उत्पादक देश ‘ओपेक’ राष्ट्रांनी कच्च्या तेलाची आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी वाढूनही उत्पादन मात्र मर्यादितच ठेवले आहे. यामुळे सातत्याने इंधनाचे दर जागतिक पातळीवर वाढत आहेत. भारतात केंद्र व राज्य सरकारचे करांचे प्रचंड ओझे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे वाढणारे दर यामुळे उच्चांकी महागड्या दरांत पेट्रोल-डिझेल खरेदीची झळ सर्वच नागरिकांना सोसावी लागत आहे.
तेल कंपन्या त्यांचा नफा कमी करण्यास तर दोन्ही सरकारे त्यांचे उत्पन्न कमी करण्यास तयार नसल्याने महागाई भडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सणासुदीच्या काळात स्वयंपाकाच्या गॅसपासून इंधनापर्यंत सगळेच महागले असल्याने नाराजीचा सूर पाहायला मिळत असून यात महिला वर्गाची नाराजी प्रचंड आहे. त्यांचे महिन्याचे आर्थिक बजेट बिघडले असून घरखर्च चालविणे अवघड बनले आहे.