नाशिक: रस्त्यावरील खड्ड्याने घेतला आणखी एका महिलेचा बळी!

नाशिक: रस्त्यावरील खड्ड्याने घेतला आणखी एका महिलेचा बळी!

नाशिक (प्रतिनिधी): हिरावाडी रोडवरील अगरबत्ती चौकात दुचाकी खड्ड्यात आदळून पाठीमागील महिला पडल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अशा प्रकारची ही दुसरी घटना असून, गेल्या महिन्यात नाशिक- पुणे रोडवर खड्ड्यात दुचाकी आदळून पाठीमागे बसलेल्या महिलेचा बळी गेल्याची घटना घडली होती.

तर, दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दुचाकी दुभाजकावर धडकून झालेल्या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे.

प्रभादेवी बाबूराव यादव (५२, रा. विघ्नहर्ता अपार्टमेंट, हिरावाडी, पंचवटी) असे मयत महिलेचे नाव आहे. रविवारी (ता. १) सकाळी अमोल यादव हा दुचाकीवर आई प्रभादेवी यांना घेऊन जात होता. अगरबत्ती चौकातील खड्ड्यात त्याची दुचाकी आदळली असता, प्रभादेवी रस्त्यावर पडल्या. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता, उपचार सुरू असताना त्यांचा मंगळवारी (ता. ३) मृत्यू झाला.

हे ही वाचा:  नाशिक: प्रमाणापेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचा अपघात, चार जण जखमी

याप्रकरणी पंचवटी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच, त्र्यंबक रोडवर दुचाकी दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात अतुल नामदेव कुमावत (२५, रा. उत्कर्ष नगर, त्र्यंबक रोड) याचा मृत्यू झाला. सदर घटना सोमवारी (ता.२) रात्री घडली.

हे ही वाचा:  नाशिक शहरातील 'या' वाहतूक मार्गात ९ नोव्हेंबरपर्यंत महत्वाचा बदल !

या अपघातामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी सामाजिक कार्यकर्ते अक्षय धांडे यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, मृत घोषित केले. याप्रकरणी गंगापूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तर दुसऱ्या घटनेमध्ये मंगळवारी (ता.३) रात्री एकच्या सुमारास ललन गंगा यादव (३२) हे उमेश यादव (४२, रा. आडगाव) यांना दुचाकीवर घेऊन मुंबई- आग्रा उड्डाणपुलावरून आडगावच्या दिशेने जात होते. अमृतधाम चौकात त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुभाजकावर जाऊन धडकले.

हे ही वाचा:  नाशिक: विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयातर्फे निर्बंध जारी!

या अपघातामध्ये उमेश यादव यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पंकजकुमार यादव यांच्या फिर्यादीनुसार, उमेश यादव यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ललन यादव यांच्याविरुद्ध पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पंचवटी पोलिसांनी ललन यादव यास अटक केली आहे. उपनिरीक्षक वाय. एस. माळी तपास करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790