नाशिक शहर: महिनाभरात पाणीपट्टी भरल्यास तीन टक्के सूट
नाशिक (प्रतिनिधी): थकीत पाणीपट्टी शंभर कोटी रुपयांच्या पुढे गेल्याने अखेर महापालिकेने सवलत योजना लागू केली आहे.
त्यासाठी महासभेत जादा विषयामध्ये नवीन नियमावली मंजूर केली असून, त्यात नियमित देयकांची रक्कम महिनाभरात अदा केल्यास पाणीपट्टीत तीन टक्के सवलत दिली जाणार आहे.
थकबाकीदारांकडून वसुलीसाठी वार्षिक बारा टक्के दराने दंड व व्याजाने आकारणी केली जाणार आहे.
महापालिकेच्या पाणीपट्टीची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या ११० कोटींच्या वर थकबाकीची रक्कम गेली आहे, तर नियमित पाणीपट्टीदेखील वसूल होत नाही.
वसुलीसाठी महापालिकेने थकबाकीदारांविरुद्ध मोहीम उघडली होती. परंतु, प्रतिसाद न मिळाल्याने थकबाकी व नियमित पाणीपट्टी वसुलीसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. विशेष म्हणजे नियमावली मंजूर करताना गाजावाजा न करता जादा विषयात मंजुरी देण्यात आल्याने प्रस्ताव मंजूर झाला की नाही, याबाबतदेखील साशंकता आहे.
२५ हजार रुपयांपेक्षा अधिक पाणीपट्टी थकबाकीदारांची संख्या ४,२८५ असून, त्यांच्याकडे ४० कोटी रुपये थकबाकी आहे. त्यांच्यावर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारताना दुसरीकडे नियमावली मंजूर केली आहे. नळ जोडणीधारकांना पाणीपट्टीचे देयके मिळाल्यानंतर मागील थकबाकी वगळता एक महिन्याच्या आत पाणीपट्टी अदा केल्यास तीन टक्के सवलत दिली जाणार आहे. तर, ३१ मार्चपर्यंत थकबाकी रक्कम अदा न केल्यास थकबाकीच्या रक्कमेवर वार्षिक बारा टक्के विलंब शुल्क व दंड आकारला जाणार आहे.