नाशिकच्या एसटी कर्मचाऱ्यांनी केलं मुंडन आंदोलन
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमध्ये देखील आज ST कर्मचाऱ्यांचे आंदोलन सलग सुरु असून आज या कर्मचाऱ्यांनी मुंडन आंदोलन करत सरकरचा निषेध नोंदविला. तर मनसेने आता या आंदोलनात उडी घेत या ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.
नाशिक मध्ये सलग दुसऱ्या दिवशीही विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे. एसटी कर्मचाऱ्यांना शासनामध्ये समाविष्ट करून घेण्याची प्रमुख मागणी घेऊन या आंदोलनाला सुरवात करण्यात आली आहे. जोपर्यंत आमची ही प्रमुख मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन माघे घेणार नाही असे कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
आंदोलनामुळे प्रवाशांचे मात्र मोठे हाल होताना दिसत आहेत. तर दुसऱ्या दिवशी देखील एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. एकही बस बाहेर जाऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. ST कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला आता मनसेने देखील पाठिंबा दिला आहे. नाशिक मनसे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते यांनी पंचवटी येथील ST बस डेपो येथे आंदोलनाला पाठिंबा देत आपला सहभाग नोंदविला होता.
याचपाठोपाठ आज या ST कर्मचाऱ्यांनी मुंडन करत सरकारचा निषेध नोंदविला आहे. नाशिकच्या एन.डी.पटेल रोड येथील बस डेपो येथे आंदोलनाला बसलेल्या ST कर्मचाऱ्यांनी हे मुंडन आंदोलन केले. त्यामुळे आता येत्या काळात सरकार या ST कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत काय निर्णय घेतात हे बघणं महत्वाचे ठरणार आहे. हे आंदोलन जर असंच सुरु राहिलं तर प्रवाशांचे मात्र ऐन सणासुदीच्या काळात मोठे हाल होणार हे मात्र नक्की..