डॉ. प्राची वसंतराव पवार यांच्यावर हल्ला करणारे तिघे जेरबंद.. ‘या’ कारणामुळे केला होता हल्ला…
नाशिक (प्रतिनिधी): डॉ. प्राची वसंतराव पवार या आपल्या गोवर्धन परिसरातील फार्म हाऊसवर गेल्या असता तिघा हल्लेखोरांनी त्यांच्यावर सशस्त्र हल्ला केला होता.
ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या व नाशिक तालुका पोलीस पथकाने या तिघाही हल्लेखोरांना जेरबंद केले आहे.
दि. १३ डिसेंबर २०२२ रोजी डॉ. प्राची पवार या गोवर्धन शिवारातील आपल्या फार्म हाऊसवर गेल्या असता फार्म हाऊसच्या गेटवर एक अज्ञात आरोपीने मोटारसायकल आडवी लावून त्यावर तो बसला होता. “गाडी आडवी का लावली?” असे डॉ. प्राची पवार यांनी विचारले असता त्या आरोपीने गाडी बाजूला न घेता उलट त्यांच्याशी अरेरावीची भाषा केली.
थोड्याच वेळात शेजारील पिकामध्ये लपून बसलेले दोघे जण तेथे आले व त्यांनीही हुज्जत घालणे सुरू केले. त्यापैकी एकाने लोखंडी धारदार कोयत्याने डॉ. प्राची पवार यांच्यावर हल्ला केला. हा वार हाताने अडविल्यामुळे डॉ. प्राची पवार जखमी झाल्या. यावेळी तिसर्या आरोपीने “मारून टाका, सोडू नका,” अशी चिथावणी दिली आणि डॉ. पवार यांना गंभीर जखमी अवस्थेत सोडून तिघेही मोटारसायकलीवर बसून पळून गेले.
या प्रकरणी नाशिक तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, संशयित आरोपी हे गुन्हा केल्यानंतर त्याच मोटारसायकलीवरून नाशिक शहराकडे येत असताना भरधाव मोटारसायकलीला अपघात होऊन ते खाली पडले. खाली पडलेले तरुण आणि आरोपींचे वर्णन जुळत असल्यामुळे पोलिसांनी त्यांचा शोध घेतला आणि अभिषेक दीपक शिंदे (वय १९, रा. इंदुमती बंगला, कलानगर, प्रमोद महाजन उद्यानाच्या मागे, गंगापूर रोड), तसेच धनंजय अजय भवरे (वय १९, रा. कावणे, ता. देवळा, सध्या मु. अवधूतवाडी, दिंडोरी रोड, म्हसरूळ) व पवन रमेश सोनवणे (वय २२, रा. लोहोणेर, ता. बागलाण, सध्या रा. सातपूर कॉलनी) या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली.
यावेळी तिघांनी प्राची पवार यांच्याशी अरेरावी करून धारदार हत्याराने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याची कबुली दिली.
या कारणातून बदला:
पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी अभिषेक शिंदे याने सांगितले, की त्याची आत्या कोरोना महामारीच्या काळात दि. १२ मे २०२१ रोजी सुश्रुत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना मरण पावली होती. याचा राग मनात धरून अभिषेकने त्याचे साथीदार धनंजय भवरे व पवन सोनवणे यांना प्रत्येकी दहा हजार रुपये देण्याचे कबूल करून डॉ. प्राची पवार यांना अद्दल घडवायची, या उद्देशाने हल्ल्याची तयारी केली, तसेच अभिषेकने भद्रकाली परिसरातून चॉपरसारखे धारदार हत्यार खरेदी केले होते. घटनेच्या दिवशी डॉ. प्राची पवार हॉस्पिटलमधून निघाल्यानंतर त्यांचा पाठलाग करून त्यांच्या फार्म हाऊसवर पोहोचून गाडी आडवी लावून डॉ. प्राची पवार यांना अरेरावी केली, तसेच धारदार हत्याराने हल्ला केला. या प्रकरणी दहा पोलीस अधिकारी व ४० पोलीस अंमलदार यांची १० पथके जिल्हाभरात अहोरात्र तपास करीत होती.