गॅस कटरच्या सहाय्याने ॲक्सिस बँकेचे एटीएम फोडून २२ लाखांची चोरी
नाशिक (प्रतिनिधी): सिन्नर येथील सरदवाडी मार्गावरील ॲक्सिस बँकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने तोडण्यात आले.
त्यातील २२ लाख ७१ हजार ३०० रुपयांची रक्कम चोरट्यांनी काढून नेली. शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली. मात्र दुपारी चारला चोरी उघडकीस आली.
चोरट्यांनी संपूर्ण चेहरा झाकून घेतला होता. एटीएम केंद्रात आल्यावर लगेचच सीसीटीव्ही कॅमेऱ्याची केबल तोडण्यात आली.
गॅस कटरच्या सहाय्याने एटीएमची एक बाजू पूर्णपणे छेद कापून काढण्यात आली होती. घटनेवेळी चोरट्यांनी एटीएम केंद्राचे शटर खाली ओढून घेतले होते. चोरी केल्यानंतर शटर तसेच खाली ठेवून ते पसार झाले.
एटीएम केंद्राचे शटर खाली असल्याने ते बंद असावे असा स्थानिक रहिवासी, व्यावसायिक व नागरिकांचा समज झाला. एकास शंका आल्याने शटर वर करून पाहिले त्यावेळी मशीन फोडल्याचे निदर्शनास आले. याबाबतची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. अप्पर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, उपअधीक्षक सोमनाथ तांबे, निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्यासह पोलिसांनी परिसरात शोध घेण्याचा प्रयत्न केला. सरदवाडी मार्गावरील विविध दुकानांमध्ये लावलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते. घटनेची माहिती ॲक्सिस बँकेचे शाखा व्यवस्थापक संतोष झाडे यांना कळविण्यात आली.त्यानंतर रितसर तक्रार दाखल करण्यात आली. फॉरेन्सिक लॅबच्या तसेच सायबर तज्ज्ञांनी एटीएम केंद्रातून ठशांचा शोध व माहिती घेण्याचा घेण्याचा प्रयत्न केला.