कोळसाटंचाईचे संकट गडद; लोडशेडिंग पुन्हा सुरु होणार का ? जाणून घ्या…

कोळशाअभावी वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच बंद; सकाळ, संध्याकाळ ६ ते १० पर्यंत वीज कमी वापरा

मुंबई (प्रतिनिधी): कोळशाच्या टंचाईमुळे महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच सद्यस्थितीत बंद पडले आहेत.

त्यामुळे तब्बल ३३३० मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प पडला आहे. विजेची ही तूट भरून काढण्यासाठी तातडीच्या वीजखरेदीसह जलविद्युत व अन्य स्त्रोतांकडून वीजपुरवठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

राज्यात विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न सुरु असून वीजग्राहकांनी मागणी व उपलब्धता यामध्ये समतोल राखण्यासाठी सकाळी ६ ते १० व सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत विजेचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

देशभरात कोळसाटंचाई निर्माण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून औष्णिक वीजनिर्मिती कोळशाअभावी हळूहळू कमी होत आहे. त्यातच महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील १३ संच कोळशाअभावी सध्या बंद पडले आहेत. यात महानिर्मितीचे चंद्रपूर, भुसावळ व नाशिक प्रत्येकी २१० मेगावॅटचे तसेच पारस- २५० मेगावॅट आणि भुसावळ व चंद्रपूर येथील ५०० मेगावॅटचा प्रत्येकी एक संच बंद झाला आहे. यासोबतच पोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडचे (गुजरात) ६४० मेगावॅटचे चार संच आणि रतन इंडिया पॉवर लिमिटेडचे (अमरावती) ८१० मेगावॅटचे तीन संच बंद आहेत. यामुळे महावितरणला औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमधून कराराप्रमाणे मिळणाऱ्या विजेमध्ये घट होत आहे.

विजेच्या मागणी व उपलब्धता यामधील सध्या ३३३० मेगावॅटची तूट भरून काढण्यासाठी खुल्या बाजारातून (पॉवर एक्सचेंज) वीज खरेदी सुरु आहे. देशभरात विजेची मागणी वाढल्यामुळे वीज खरेदीचे दर महाग होत आहे. खुल्या बाजारातून ७०० मेगावॅट विजेची खरेदी १३ रुपये ६० पैसे प्रतियुनिट दराने करण्यात येत आहे. तर आज सकाळी रियल टाईम व्यवहारातून ९०० मेगावॅट विजेची ६ रुपये २३ पैसे प्रतियुनिट दराने खरेदी करण्यात आली. यासोबतच कोयना धरण तसेच इतर लघु जलविद्युत निर्मिती केंद्र आणि अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांद्वारे वीज उपलब्ध करण्यात येत आहे.

कोळसा टंचाईचे सावट गडद होत असतानाच राज्यात उष्मा वाढल्यामुळे विजेची मागणी देखील वाढली आहे. राज्यात (मुंबई वगळून) काल, शनिवारी १७,२८९ मेगावॅट विजेची मागणीप्रमाणे महावितरणकडून पुरवठा करण्यात आला. तर गेल्या २४ तासांमध्ये राज्याच्या काही भागात पाऊस झाल्यामुळे आज विजेच्या मागणीत घट झाली. आज, रविवारी सकाळी ११.३० वाजता राज्यात १८,२०० मेगावॅट तर महावितरणच्या कार्यक्षेत्रात १५ हजार ८०० मेगावॅट विजेची मागणी होती. विजेचे भारनियमन टाळण्यासाठी मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार कृषिवाहिन्यांवर दररोज ८ तास दिवसा किंवा रात्री चक्राकार पद्धतीने थ्री फेज वीजपुरवठा करण्यात येत आहे.

कोळसा टंचाईमुळे विजेचा तुटवडा वाढण्याची शक्यता अधिक असल्याने मागणी व पुरवठा यात समतोल ठेवण्यासाठी वीजग्राहकांनी सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेदरम्यान विजेचा वापर अतिशय काटकसरीने करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. विजेची सर्वाधिक मागणी असणाऱ्या कालावधीत विजेचा वापर कमी झाल्यास मागणी व उपलब्धता यातील तूट कमी होईल व भारनियमन करण्याची गरज भासणार नाही.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
Get Instant Updates