३ रुपयांचा मास्क विकला चक्क १६ रुपयाला; मेडिकलवर नियंत्रण आवश्यक

नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाचा संसर्ग अद्याप टळलेला नाही. म्हणून शहरात भीतीचे वातावरण आहे. मात्र, दुसरीकडे कोरोनाच्या नावाखाली ग्राहकांची आर्थिक लूट सुरू असून, ३ रुपयांचा मास्क चक्क १६ रुपयांना विकला जात असल्याची तक्रार, मजूर संघाचे माजी अध्यक्ष संभाजी पवार यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे केली आहे. ग्राहकांची आर्थिक लूट होऊ नये म्हणून, राज्य शासनाने हॉस्पिटल, औषधे व मास्कचे दर  ठरवून दिलेले आहेत.

तरीदेखील कोरोनारुग्णांवर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयांकडून ग्राहकांची लूट होत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत.त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र ऑडिटरचीही नेमणूक केली आहे. तसेच ग्राहकांच्या तक्रारींसाठी हेल्पलाईनही सुरू केली आहे. परंतु, आता प्रश्न फक्त रुग्णालयांचा नाही तर, मेडिकलवरच्या नियंत्रणाचा देखील आहे. कारण शहरातील सनराईस मेडिकल अँड जनरल स्टोअर्सने ३ रुपयांना मिळणारा मास्क तब्बल १६ रुपयांना विकला आहे. याप्रकरणी संभाजी पवार यांनी तक्रार केली असून, अशाप्रकारे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक सातत्याने होत आहे. तरी अशी आर्थिकलूट करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त माधुरी पवार यांच्याकडे करण्यात येत आहे. मास्कचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध असल्यामुळे त्यांचे दरही वेगवेगळे असतात. यूज अँड थ्रो हा मास्क अगदी कमी किंमतीत मिळतो. त्याची किंमत ३ ते ५ रुपये आहे. मात्र, मेडिकल चालक त्याचे १६ रुपये घेतो, ही धक्कादायक बाब आहे.