कौतुकास्पद – सुट्टीवर असलेल्या पोलिसाने बजावले आपले कर्तव्य! वाचा सविस्तर.

नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील गुन्हे शाखेच्या युनिट-२ मध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी गुलाब सोनार यांनी त्यांच्या पत्नी आणि नातेवाईकांच्या मदतीने दोन सराईत सोनसाखळी चोर पकडले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलाब सोनार हे संगमनेरकडून नाशिकला येत असताना त्यांना रस्त्यात दोन संशयित दुचाकीने (एम.एच.०८एलपी५३४७) जाताना दिसले. शहरांमधील सोनसाखळीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपींच्या वर्णनाच्या आधारे‌ व सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेले सोनसाखळी दुचाकी चोर आणि रस्त्यावर दुचाकीने जाणारे हे दोघे एकच असल्याची त्यांना खात्री पटली. सोनार यांनी संशयितांचा पाठलाग केला. काही अंतरावर गेल्यावर इतर नातेवाईक आणि नागरिकांच्या मदतीने दोघांना पकडले. तसेच संशयितांकडून कोब्रा स्प्रे, धारदार सुरे, फायटर व ४ सोनसाखळ्या असा मुद्देमाल जप्त केला. सुट्टीवर असून देखील सोनार यांनी कर्तव्य बजावले म्हणून पोलीस आयुक्त दीपक पांडे, उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी सोनार यांचे कौतुक केले.