या रुग्णालयांची लवकरच होणार कोविड सेंटर म्हणून उभारणी!

नाशिक (प्रतिनिधी) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महापालिकेच्या वतीने शहरात कोरोनाला आवर घालण्यासाठी नवीन रूग्णालयांच्या उभारणीला परवानगी दिली जात आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला रुग्णालयांमध्ये बेडच उपलब्ध नसल्याची तक्रार देखील होताना दिसते. तरी महापालिका रुग्णालयात खाटांची व्यवस्था न करता नवीन कोविड सेंटर उभारण्याच्या कामात लागली आहे. वडाळा, मुलतानपुरा रुग्णालयाची लवकरच कोविड सेंटर म्हणून उभारणी होणार असल्याचे महापालिकेने सांगितले आहे.

मुलतानपुरा येथे देखील महापालिकेचे रूग्णालय वापराविना पडून आहे.  दुसरीकडे महापालिका वडाळा येथे रुग्णालय सुरू करण्याची घोषणा करते. मात्र, स्टाफ नसल्याने सारे काम अडून आहे. त्याचप्रमाणे संभाजी राजे स्टेडियम येथे नवीन कोविड सेंटर झाले असून तेथे २०० बेड तयार केले गेले आहे. गुरुवारी (दि.२४) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत वर्षा भालेराव यांनी पुन्हा मनपाचे रुग्णालय इनअॅक्टिव्ह दाखवले जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. तर सुप्रिया खोडे यांनी वडाळा रुग्णालय सुरू करण्याची मागणी केली. यासंदर्भात वडाळा रुग्णालयात डॉक्‍टर नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.