म्हणून दोघा चिमुकल्यांना संपवून आईनेही केली आत्महत्या….

नाशिक (प्रतिनिधी) : सिन्नर तालुक्यात असलेल्या चांदगिरी गावातील कडवा कॅनॉल मध्ये दिपाली पाडवी या महिलेसोबत ५ वर्षांची मुलगी राजश्री आणि १ वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला होता. यासंदर्भात महिलेचा भाऊ महेंद्र गवळी (२७, रा. कोटंबी, पेठ) यांनी महिलेचा पती कमलेश पाडवी (वय ३०, रा. शिंदेगाव, नाशिक) विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

महेंद्र गवळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची बहिण दिपालीला २०१५ मध्ये मुलगी झाली. तेव्हापासून तिचा पती कमलेश “तू लग्नात आम्हाला काही दिले नाही” असे म्हणत तिला रोज मानसिक आणि शारीरिक त्रास द्यायचा. दररोज दारू पिऊन दिपाली आणि दोघा मुलांना मारहाण करून शिवीगाळ करायचा. दीपालीवर संशय घेऊन कुणाशी बोलू देत नव्हता तसेच माहेरी सुद्धा राहू देत नव्हता. “मोटारसायकल घेण्यासाठी तुझ्या भावाकडून १५००० आण” असा दररोज दिपालीच्या मागे तगादा लावायचा. म्हणून या मानसिक त्रासाला कंटाळून दीपालीने आपल्या दोघा मुलांना संपवून स्वतः आत्महत्या केली.