महिनाभरानंतर नाशिककरांच्या चलनात येणार २० रुपयांचे नाणे !

नाशिक (प्रतिनिधी) : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून २० रुपयांचे नवीन नाणे काढण्यात आले आहे. तर नाशिकचे प्रसिद्ध नाणे संग्राहक असलेले रमेश बुब यांच्यामार्फत नाशिकमध्ये सर्वप्रथम हे २० रुपयांचे नाणे दाखल झाले आहे.

केंद्र सरकारने ८ मार्च २०१९ रोजी नाण्यांची सिरीज जारी केली होती. यामध्ये २० रुपयांच्या नाण्याचा समावेश होता. तर, गतवर्षी रिसर्व्ह बँकेने परिपत्रक काढून १४ प्रकारच्या नाण्यांची वैधता सुरू ठेवल्याचे जाहीर केले होते. तसेच या नाण्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. २० रुपयांचे हे नाणे ५ रुपयाच्या नाण्यापेक्षा थोडे मोठे व वजनानेही जड आहे. या नाण्याची विशेषता म्हणजे हे नाणे दिव्यांगांना देखील हाताळण्यास सोपे आहे. हे नाणे २७ मिलीमीटर आकाराचे आहे. तर नाण्याच्या दर्शनी भागावर अशोकस्तंभाचे चित्र आहे व त्याखाली ‘सत्यमेव जयते’ असे लिहिले आहे. हे नाणे शहरात वापरात येण्यासाठी महिनाभराचा वेळ लागेन. मात्र, रमेश बुब यांच्या नेहमीच नवीन नाणे किंवा नोट शहरात सर्व प्रथम आणण्याच्या छंदामुळे हे नाणे अखेर नाशिकमध्ये दाखल झाले आहे.