महापालिकेला घरपट्टी वसुलीत ४५ कोटींचा फटका!

नाशिक (प्रतिनिधी) : कोरोनाच्या विळख्यात सर्वच क्षेत्र अडकले असून महापालिकेलाही याचा मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला आहे. महापालिकेचे जकात, एलबीटी व पाणीपट्टी हे उत्पन्नाचा स्रोत आहेत. त्यात घरपट्टी हा उत्पन्नाचा विशेष मोठा स्रोत आहे. मात्र, कोरोनाच्या या संकटकाळामध्ये घरपट्टी वसुलीसाठी सवलती देऊनही हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे महापालिकेला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून, यावर्षी घरपट्टी वसुलीत तब्बल ३५ कोटी रुपयांचा आर्थिक फटका महापालिकेला बसला आहे.

दुसऱ्या बाजूला मागच्या वर्षीच महापालिकेला नगररचना विभागाच्या विकास शुल्कामध्येही मोठी वाढ झाली होती. ३०० कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळाले होते. मात्र, कोरोनाने आर्थिक गणितच बिघडवून ठेवले आहे. दरवर्षी महापालिका आर्थिक वर्ष सुरू झाल्यावर एप्रिल ते जून महिन्यांत महापालिकेच्या देयकाची वाट न बघता घरपट्टी भरणाऱ्यांना २ ते ५ टक्के सवलत देते. तसेच ऑनलाइन भरणा केल्यास आणखी १ टक्का सवलत देते. मात्र, यंदा सवलतीच्या कालावधीत मुदत वाढवून देखील काही फायदा झालेला नाही. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात ९३ कोटी २२ लाख १६ हजार रुपयांची घरपट्टी वसूल झाली होती. मात्र, चालू वर्षी संपलेल्या सप्टेंबर महिन्यापर्यंत ५८ कोटी ११ लाख रुपयांची घरपट्टी जमा झाली असून, मागील वर्षाच्या तुलनेत पाणीपट्टी दहा कोटी कमी वसुल झाली आहे‌. तर घरपट्टी आणि पाणीपट्टी‌‌ हे दोघं मिळून सरासरी ४५ कोटी रुपयांची घट या वर्षी झाली आहे.