महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये कोविड-१९ चाही समावेश….

नाशिक (प्रतिनिधी) : राज्य शासनाने २३ मार्चपासून महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये कोरोना आजाराचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो. तरी या योजनेबाबत माहिती नागरिकांपर्यंत सोप्या पद्धतीने पोहोचवण्यासाठी चलतचित्र प्रणालीचा वापर जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केला. त्याचबरोबर योजनेचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी नागरिकांना आवाहन देखील केले.

तसेच, कोरोनाची लागण होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. मात्र, लागण झाल्यास लागलीच उपचार करावे असेदेखील ते म्हणाले कोरोना महामारीचा खर्च परवडणारा नाही. मात्र, महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत खर्च कमी करण्यासाठी मदत होऊ शकते. त्यामुळे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड व रेशन कार्ड या कागदपत्रांची पूर्तता नागरिकांनी रुग्णालयात उपचारादरम्यान करावी. तसेच टेलिफोनिक इंटिमेशनची सुविधा देखील याअंतर्गत उपलब्ध आहेत. तरी रुग्णालय प्रशासनाने देखील या पद्धतीने कार्यवाही करावी असे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले आहे. सदर योजनेसाठी उपजिल्हाधिकारी निलेश श्रींगी यांच्यावर समन्वयक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत रुग्णालये रुग्णांना मदत करत आहेत की, नाही याची दक्षता ते घेत आहेत. तर या योजनेसाठी पंकज दाभाडे यांची देखील समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या योजनेसंदर्भात नागरिकांना जर काही अडचणी असतील तर दाभाडे यांच्या भ्रमणध्वनी या ९४०४५९४१६१ क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन देखील जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले आहे.