भद्रकाली पोलिसांची कारवाई; चोरट्यांकडून केले ५ लाखांचे ३८ मोबाईल जप्त !

नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील भद्रकाली पोलिसांनी गुप्त मिळालेल्या माहितीवरून चोरट्यांना पकडले आहे. दरम्यान, ५ लाख ४८ हजार ५०० रुपये किमतीचे ३८ मोबाईल मालेगावच्या चोरट्यांकडून हस्तगत केले आहेत.

गुन्हे शोध पथकामार्फत मोबाईल चोरीचा तपास सुरु होता. दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांनी गुन्हे शाखा पथकाला सूचना केल्या होत्या. त्यानुसार, दोन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

यामध्ये संशयित आरोपी शफिक तौफिक शेख (वय ३५) हा कमलापुरा, मालेगाव येथील असून, मागील काही वर्षांपासून तो जुने नाशिक परिसरात राहतो. तसेच त्याचा दुसरा साथीदार संशयित आरोपी मोहम्मद आमीन अब्दुल रहीम अन्सारी (वय ४०, रा.नायपुरा, मालेगाव) हे दोन्ही संगनमत करून शहरातील वेगवेगळ्या परिसरात चोरी करत असत.

त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, कसून चौकशी केली असता त्यांनी मिळून वेगवेगळ्या भागात चोरी केल्याची कबुली  दिली. तसेच त्यांच्या जवळील ३८ मोबाईल देखील जप्त करण्यात आले आहेत.