पोलिसांच्या त्रासाला कंटाळून मी फाशी घेतोय; व्हिडीओ तयार करत तरुणाची आत्महत्या

नाशिक (प्रतिनिधी): पोलिसांच्या त्रासाला कंटाळून मी फाशी घेत असल्याचा व्हिडीओ तयार करत एका तरुणाने नाशिकमध्ये आत्महत्या केलीय, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे. नाशिकच्या गंजमाळ परिसरातील भिमवाडीमध्ये राहणाऱ्या योगेश हिवाळे या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या एका तरुणाने आत्महत्या केल्याचं सोमवारी मध्यरात्री उघडकीस आलं मात्र योगेशच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या या व्हिडीओमुळे नाशकात एकच खळबळ उडालीय.

भीमवाडीत याच ठिकाणी योगेशने आत्महत्या केल्याचं समोर आलं होत. विशेष म्हणजे त्याच्या मोबाईलमध्ये एक व्हिडीओ देखील आढळून आला. त्यात वराडे मला त्रास देत असल्याचा उल्लेख होता. व्हिडीओमध्ये योगेशने नाव घेतलेले भद्रकाली पोलीस ठाण्याचे अधिकारी वराडे यांनी वारंवार योगेशला त्रास देत धमकावल्याचा आरोप योगेशच्या कुटुंबांनी केला आहे. त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत शेकडो स्थानिक नागरिकांनी सकाळी भीमवाडीत ठिय्या आंदोलन केल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला होता.

या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्तांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. हे सर्व प्रकरण संशयास्पद वाटल्याने हा तपास भद्रकाली पोलीस ठाण्याकडे न देता तो गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. संबंधित व्हिडीओ तसेच कुटुंबाच्या जबाबानुसार सखोल चौकशी केली जाऊन तपासात जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई नक्कीच केली जाईल, असे आश्वासन पोलीस उपायुक्तांकडून देण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात गुन्हेगारीने प्रचंड डोकं वर काढलंय. प्राणघातक हल्ले, लूटमार, चोऱ्या असे प्रकार रोजचेच झाले आहेत आणि त्यात आता हा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडालीय. या आत्महत्येमागील नक्की कारण काय? व्हिडीओमध्ये योगेशने नाव घेतलेले अधिकारी खरंच त्रास देत असतील तर ते नक्की कोणत्या कारणांमुळे? पोलिसांचे गुन्हेगारांशी संबंध असतात असे म्हंटले जाते आणि हा सर्व प्रकार म्हणजे त्याचेच तर उदाहरण नाही ना? असे अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत असून या प्रकरणाची योग्य ती चौकशी होणं आता गरजेचे आहे.

आत्महत्येपूर्वीच्या व्हिडीओमध्ये काय म्हणाला तरुण?


“मी योगेश हिवाळे फाशी घेतोय, भद्रकाली पोलीस ठाण्याचे एस. एस. वराडे साहेबांनी मला खूप त्रास दिलाय. तुझे आता थोडे दिवस बाकी आहे, मला धमक्या देतो मागे माझ्या घरात तलवार ठेवली होती त्याने. फाशी घेण्यास त्याने मला मजबूर केले आहे. माझ्या आई वडिलांना, भावांना त्रास नको व्हायला एवढीच माझी ईच्छा. मला फक्त वराडे यांनीच त्रास दिला आहे बाकी कोणीच नाही.”