परिचय उद्यानाचे लवकरच होणार नुतनीकरण!

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक महानगरपालिकेचे गंगापूर येथील मल शुद्धीकरण केंद्र, परिचय उद्यान, गंगापूर येथे उभारण्यात येणारे भाजी मार्केट, गंगापूर धरण येथील पंपिंग स्टेशनची पाहणी आयुक्त कैलास जाधव यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली यावेळी विविध कामाच्या सूचना विभागांना दिल्या.

गंगापूर येथील मल शुद्धीकरण केंद्र येथील कामाची पाहणी आयुक्त कैलास जाधव यांनी केली यावेळी स्काडा, अँटोमेशन आदी बाबत सविस्तर माहिती घेऊन पाण्याच्या गुणवत्तेबाबत सविस्तर माहिती घेऊन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथे पाहणी करून भविष्यातील पाण्याची शहराची आवश्यकता लक्षात घेता धरणापासून मनपाच्या शहरातील मलशुद्धीकरण केंद्रापर्यंत राँ वॉटर रायझिंग मेन (पाईप लाईन) ची माहिती घेतली.  पाईपचे आयुष्यमान तपासून त्याऐवजी नवीन पाईप लाईन टाकण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.

तसेच या ठिकाणाहुन शहरातील पाणीपुरवठा कशा पद्धतीने होतो याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेतली. गंगापूर येथील परिचय उद्यानाची पाहणी करून त्याबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली तसेच याठिकाणी उभारण्यात आलेल्या विविध सुविधा व इतर बाबतची माहिती घेऊन उद्यानाचे नूतनीकरण करणेच्या दृष्टीने कामाचे नियोजन करण्याच्या सूचना आयुक्त कैलास जाधव यांनी यावेळी दिल्या. गंगापूर गाव येथील भाजी मार्केट ची इमारतीचे नुतनीकरणाचे काम सुरू सुरू आहे. त्या कामकाजाची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी घेतली व या कामाला गती देण्याच्या सूचना विभागास दिल्या.