नाशिक शहरात महावितरण आणि महानगरपालिकेच्या कारवाईचा धडाका !

नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील वडाळा भागात महावितरणच्या पथकाने छापा टाकला. दरम्यान, ३ औद्योगिक कारखाने व १ गोठा येथे अनधिकृतपणे केबल टाकून वीज चोरी करत असल्याचा प्रकार समोर आला. तर, पालिकेकडून नाशिकरोड परिसरात टेम्पोमधून थर्माकोल जप्त करण्यात आला.

गुरुवारी (दि.२१ जानेवारी) रोजी महावितरणच्या नाशिक परिमंडळातील नाशिक शहर, विभाग २ अंतर्गत छापा टाकण्यात आला. यामध्ये ३ प्लास्टिक रिसायकलिंग करणारे औद्योगिक कारखाने व १ व्यवसायिक गोठाधारक यांच्यावर कारवाई करण्यात आली. तर दुसर्‍या बाजूला गुरुवारीच प्रतिबंधित प्लास्टिक आणि थर्माकोलची वाहतूक करण्याचा प्रकार समोर आला. दरम्यान, महापालिका व महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या अधिकार्‍यांच्या पथकाने मिळून कारवाई केली. याप्रकरणी वाहन चालक व अंबड परिसरातील निखिल इंटरप्राईजेस या कंपनीच्या मालकाला असे प्रत्येकी ५  हजार रुपयांचा दंड ठोठाण्यात आला.