नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या लसीकरणाचा ‘ड्राय रन’ आजपासून

नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाच्या प्रतिबंधासाठी केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आजपासून  (8 जानेवारी 2021 रोजी) जिल्ह्यात ‘ड्राय रन’ मोहिम राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रुग्णालय, सैय्यद पिंपरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, नवीन बिटको व मालेगांव येथील आरोग्य केंद्र ही ठिकाणे ‘ड्राय रन’ साठी निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड19 लसीकरणाच्या ‘ड्राय रन’ नियोजनाबाबत आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी मांढरे बोलत हेाते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. रविंद्र चौधरी, महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बापु नागरगोजे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निखिल सैंदाणे, वैद्यकिय अधिकारी डॉ. किशोर श्रीवास, वैद्यकिय अधिकारी डॉ.अनंत पवार, जागतिक आरोग्य संघटनेचे सर्व्हलन्स मेडीकल ऑफीसर डॉ.प्रकाश नांदापुरकर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, 8 जानेवारी रोजी राबविण्यात येणाऱ्या लसीकरणाच्या ‘ड्राय रन’ साठी निवड केलेल्या आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी सकाळी 8 वाजता व कोविड-19 च्या ड्रायरनसाठी निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना सकाळी 9 वाजता नेमून देण्यात आलेल्या ठिकाणी उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले आहे. कोविड 19 ची ड्रायरन प्रक्रीया सकाळी 10 वाजता सुरू करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले आहे.

जिल्हा रुग्णालय, त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रुग्णालय, सैय्यद पिंपरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, नवीन बिटको व मालेगांव येथील आरोग्य केंद्र येथे प्रत्येकी एक नोडल अधिकारी व कर्मचारी यांची टीम बनविण्यात आली असून या टिमने ड्राय रन दरम्यान मास्क व ग्लोजचा वापर करणे अनिवार्य आहे. कोविड 19 ड्रायरन लसीकरणासाठी तीन रूमची व्यवस्था करण्यात आली असून पहिल्या वेटींग रूममध्ये निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांला सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन करून प्रत्येक लाभार्थ्यांचे तापमान घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या व्हॅक्सिनेशनच्या रूममध्ये CoWin aap या ॲप्लिकेशनमध्ये लाभार्थ्याची नोंद करण्यात येवून त्याला लसीकरणाची संपूर्ण माहिती दिली जाईल आणि त्यांनतर त्याला लसीकरण करण्यात येईल. लसीकरण झाल्यावर तिसऱ्या ऑबझरव्हेशन रूममध्ये लाभार्थ्यांला 30 मिनिट परिक्षणासाठी बसविण्यात येणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिली आहे.

लसीकरणाच्या पहिल्या फेरीत जिल्ह्यातील एकूण 18 हजार 135 शासकीय व 12 हजार 480 खाजगी संस्थामधील आरोग्य कर्मचारी यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात आले असून जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार 29 लसटोचकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच जिल्यााचत कोविड 19 लसीकरण मोहिमे अंतर्गत  लस साठविण्यासाठी 210 आयएलआर उपलब्ध असून यामध्ये एकावेळेस साधारण 11 लाख डोस साठविणची क्षमता आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.