नाशिककर सावधान: वाहतूक नियमांचे उल्लंघन कराल तर परवाना होणार निलंबित !

नाशिक (प्रतिनिधी) : शहरात गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे, सिग्नल न पाळणे हे चित्र रोजच बघायला मिळते. मात्र, आता हे सर्व आटोक्यात आणण्यासाठी व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर जबर बसणार आहे. त्यानुसार, आता फक्त दंडच वसूल न करता, ३ महिन्यांसाठी वाहन चालविण्याचे लायसन्स रद्द केले जाऊ शकते.

नाशिकमध्ये सर्वत्र वाहतूक नियमांची पायमल्ली होताना दिसून येते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, स्थापन करण्यात आलेल्या सीओआरएस समितीने काही सूचना केल्या आहेत. दरम्यान, यामध्ये राज्य शासनाने मोटार वाहन कायदा, १९८८ कलम १९ नुसार व केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम २१ नुसार, वाहतूक नियमांच्या ६ गुन्ह्यांसाठी आरटीओने दिलेला परवाना थेट ९० दिवसांसाठी रद्द करता येतो. असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी सांगितले. त्यानुसार, १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत ६९८ वाहन चालकांचे परवाने रद्द करण्यात आले. तर, १ एप्रिल २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत ११८ वाहन चालकांचे परवाने रद्द करण्यात आले.

तसेच वाहनचालक पहिल्यांदा गुन्ह्यांत आढळल्यास‌ ९० दिवसांकरिता परवाना रद्द करण्यात येतो. मात्र, त्यानंतरही अशा प्रकारच्या गुन्ह्यांची पुनरावृत्ती संबंधित वाहनचालकाकडून झाली. तर, त्याचा परवाना कायमस्वरूपी निलंबित केला जाऊ शकतो.