नायलॉन मांजाने गळा कापला गेल्याने महिलेचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नायलॉन मांजावर बंदी असताना देखील लोक त्याचा सर्रास वापर करताना दिसत आहेत. यामुळे काल सायंकाळी द्वारका येथील उड्डाण पुलावर एक घटना घडली. दुचाकीने कामावरून घरी परतत असताना एका महिलेच्या गळ्यात मांजा अडकून गळा कापून मृत्यू झाला.

अंबडमधील कंपनीतून कामाहून दुचाकीने घरी परतत असताना भारती मारुती जाधव (रा.हिरावाडी) यांच्यासोबत ही घटना घडली. गंभीर जखमी झालेल्या भारती यांना तातडीने  उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु, त्यांचा तोपर्यंत मृत्यू झाला होता. भद्रकाली पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. नाशिकमधील मांजाबंदी ही फक्त कागदोपत्री आहे की काय? असा प्रश्न समोर उभा राहिला आहे. कारण मांजामुळे अपघात होण्याची ही पहिलीच घटना नसून याआधीही छोटे मोठे अपघात घडून आले आहेत. परंतु, नायलॉन मांजामुळे  मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना आहे. प्रशासनाने यावर लवकरच काहीतरी पाऊल उचलणे आवश्यक आहे.