नवीन बिटको रुग्णालयात आणखी 1000 बेड्स उपलब्ध होणार; महापालिका आयुक्त

नाशिक (प्रतिनिधी) : शुक्रवारी (दि.३१) महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नवीन बिटको रुग्णालय आणि ठक्कर डोम येथे असलेल्या कोरोना सेंटरची पाहणी केली. यावेळी त्यांनी शिल्लक राहिलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना दिली. आयुक्त गमे यांनी स्वतः पीपीई कीट घालून येथे पाहणी करते वेळी येथील रुग्णांसोबत संवाद साधला. रुग्णांना काही अडचण असल्यास निसंकोचपणे सांगण्याचे आवाहन केले.

नवीन बिटको रुग्णालयात अँटीजेन कक्षाची पाहणी केली. तसेच रेकॉर्ड रूम, इंटरकॉम सुविधा, ऑक्सिजन पुरवठा त्यासाठी आवश्यक असणारी पाईपलाईन, व्हेंटिलेटर इत्यादींबाबत माहिती घेतली. त्यांनतर रुग्णांची भोजनाच्या सुविधांची पाहणी केली. नवीन बिटको सेंटर येथे लवकरच एक हजार खाटा उपलब्ध होणार असल्याची माहिती गमे यांनी दिली.