धक्कादायक खुलासा: नोट प्रेसमधील पाच लाख रुपयांची चोरी झालीच नाही.. तर…

धक्कादायक खुलासा: नोट प्रेसमधील पाच लाख रुपयांची चोरी झालीच नाही.. तर…

नाशिक (प्रतिनिधी): करन्सी नोट प्रेसमधून पाच लाख रुपये चोरीस गेले नसून कामाच्या अति तणावामुळे सुपरवायझरकडून बंडल चुकीने पंचिंग झाला. परंतु, प्रशासन कारवाई करेल म्हणून ही बाब लपवून ठेवल्याचे पोलिस चौकशीत सुपरवायझरने कबूल केले असून प्रशासनाने त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

उपनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सतीश खडके यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरी गेलेल्या नोटांचा बंडल हा १२ फेब्रुवारी २०२१ रोजी एक्झामिनरकडून तपासून गेल्याचे समोर आले. या विभागात प्रत्येक कामगाराची नग्न तपासणी केली जाते. त्या ठिकाणाहून नोटा बाहेर गेल्या कशा यावर पोलिसही चक्रावून गेले होते.

त्यानंतर पोलिसांनी अधिक सखोल तपासाला सुरुवात केली. या ठिकाणी सुपरवायझरच्या परवानगीशिवाय नोटांचे बंडल हे हलविले जात नाहीत. म्हणून पोलिसांनी संबंधित सुपरवायझरवर विशेष लक्ष केंद्रित केले. त्यांचे संपूर्ण रेकॉर्ड तपासण्यास सुरुवात केली. त्यामध्ये कटपॅकचे दोन सुपरवायझर यांच्याकडेच तपासाची दिशा येत होती.

पोलिस आपल्यापर्यंत पोहोचल्याचे समजताच संबंधित सुपरवायझर यांनी २४ जुलै रोजी प्रेस प्रशासनासमोर सत्य परिस्थिती कथन केली. त्यामध्ये १६४ नंबरचा नोटांचा बंडल हा चोरीस गेलेला नसून तो कामाच्या लोडमध्ये पंचिंग झाला. व्यवस्थापन कारवाई करेल म्हणून ही बाब लपवून ठेवल्याचेही सांगितले. याबाबत पोलिसांना दुजोरा मिळाला.

या प्रकरणी १३ जुलै रोजी गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलिस उपायुक्त विजय खरात आणि सहायक पोलिस आयुक्त समीर शेख यांनी पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खडके यांच्याकडे तपास सोपविला होता. तपासामध्ये पोलिस निरीक्षक कुंदन जाधव, खडके, पोलिस उपनिरीक्षक अजिनाथ बटुळे, सुधीर आव्हाड, सुदर्शन बोडके, रतनसिंग नागलोथ हे होते. पोलिस आता संबंधित सुपरवायझरच्या सीनियर मॅनेजरला या प्रकरणाची माहिती होती का याबाबत तपास करीत आहे.