गेली होती आईविरुद्ध तक्रार दाखल करायला; घेतला महिला पोलिसाचाच चावा….

नाशिक (प्रतिनिधी) : बुधवारी (दि.०५) रात्रीच्या सुमारास नशेत धुंद असलेल्या मायलेकींनी गंगापूर पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आलाय. श्री गुरुजी हॉस्पिटलच्या मागे श्रीराम अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या अमिका कोईनकर आणि सीमा कोईनकर अशी या दोघींची नावे आहेत. दोघींनी महिला पोलीस शिपायांना मारहाण आणि शिवीगाळ केली. याप्रकरणाविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की अमिका हि तरुणी बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास आपल्या आईविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात आली होती. त्यावेळी ती मद्यधुंद असल्याने उपस्थित पोलिसांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार घडत असतांना काही वेळाने तरुणीची आई सुद्धा पोलीस ठाण्यात आली. मात्र तरुणीची आईसुद्धा नशेत होती. त्यांच्यात भांडण सुरु झाले तेव्हा त्यांचे भांडण सोडवण्यासाठी महिला पोलीस शिपाई मीरा मोटे आणि रुपवते या गेल्या असता त्यांना शिवीगाळ आणि मारहाण केली. अमिका ने मीरा मोटे यांना खाली पाडून लाथाबुक्क्याने मारहाण करत गुडघ्याखाली चावा घेत दुखापत केली. तसेच पोलीस ठाण्यातील वस्तूंची नुकसान केली. त्यानंतर निर्भय पथकाने दोघींना ताब्यात घेतले.