कोरोना आणि त्यातून घ्यायचा धडा ..जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचं नाशिककरांशी हितगुज..

नाशिककरांनो, जगभरातील मार्च-सप्टेंबर लॉकडाउन, अन-लॉकडाउन हा एक कठीण कालावधी होता, ज्याने आपली जीवनशैली आणि विचार शैली बदलली. जगभरात कोरोनाचं थैमान सुरू आहे. त्यात अनेक लोक बरेही झाले आहेत तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे सगळे येत्या काही महिन्यांत अधिक कठीण होणार आहे, परंतु त्या प्रती आपले गांभीर्य दिवसेंदिवस कमी कमी होत चालले आहे. “हे आपल्या बाबतीत होणार नाही” अशी आपली ठाम धारणा आहे.

या विरुद्धच्या लढाईत आपली काही भूमिका आहे असे आपल्याला वाटत नाही. असलीच तर ती दुसऱ्यांचे दोष शोधणे अथवा उणिवा अधोरेखित करणे इतक्या पुरतीच मर्यादित आहे अशी आपली ठाम धारणा आहे. हे एक सामाजिक संकट आहे आणि समाज म्हणून आपण सर्व घटकांनी एकत्रितरित्या याचा प्रतिकार करावा लागणार आहे. लॉकडाऊन काळात आपण जी बंधने लादलेली म्हणून पाळत होतो, ती आता स्वयंस्फूर्तीने पाळणे आवश्यक आहे. उपचाराच्या साधनांवर जगभरात असलेली मर्यादा पाहता तो यावरचा शाश्वत तोडगा नसून प्रतिबंध हाच शाश्‍वत तोडगा आहे. यापुढे जो काही संसर्ग होणार आहे तो आपल्या अतिशय जवळच्या नातेवाईकांपासून, मित्रांपासून अथवा कार्यालयातील सहकारी यांचे पासुनच होणार आहे याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. म्हणूनच, आपल्या संपर्काचे वर्तुळ अत्यंत मर्यादित ठेवा. मास्क, शारीरिक अंतर आणि सॅनिटायझर हे आपले संरक्षक आहेत. प्रत्येकाची काळजी घ्या. आपल्या जवळच्या व्यक्ती, कुटुंब, मित्र, सहकारी यांच्या आणि आपल्या स्वतःच्या सुरक्षिततेची जबाबदारी आपली प्रत्येकाची आहे याची जाणीव असू द्या.