कोरोनाच्या लसीसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची नावनोंदणी करण्याबाबत सूचना

नाशिक (प्रतिनिधी) : आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोरोनाच्या लसी उपलब्ध असतील तेव्हापासून उपयोगात आणल्या जातील  त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. राज्यात देखील त्या संदर्भात आरोग्य कर्मचाऱ्यांची नावनोंदणी दिलेल्या व्यवस्थापण प्रणालीद्वारे तयार करण्याबाबत आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातून ऑनलाईन बैठक घेतली.

आरोग्य विभाग प्रधान सचिव यांनी दिलेल्या सुचनांबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले, केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राज्य शासनाने लसीकरणासाठी तयार केलेल्या व्यवस्थापन प्रणाली मध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची नाव नोंदणी करावी. यासाठी जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी असतील तर जिल्हा शल्य चिकित्सक आणि  हे त्यांना सहाय्य करतील. खाजगी आणि सरकारी रुग्णालयात सेवा देत असलेले आरोग्य कर्मचारी यांची नोंदणी होणे आवश्यक आहे.

यामध्ये राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेले शासकीय रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, सुपर स्पेशालिटी रुग्णालये, सामुदायिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य आणि निरोगीपणा केंद्र, आयुष रुग्णालये, महानगरपालिका रुग्णालये, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच जिल्ह्यातील नोंदणीकृत रुग्णालये आदी संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचारी यांचा समावेश यात करण्यात यावा. यासाठी भारतीय वैद्यकीय अकादमी, भारतीय बालरोगविषयक अकादमी यांची मदत घेण्यात यावी, असे निर्देश आरोग्य विभाग प्रधान सचिव डॉ. व्यास यांनी दिले असल्याची माहिती जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिली आहे.