एकीकडे बिलात सवलत देण्याचे शासनाचे आश्वासन ; दुसरीकडे थकबाकीसाठी महावितरणचा दबाव

नाशिक (प्रतिनिधी) : चार महिन्यांमध्ये जितके बिल येत नाही, इतके एकाच महिन्यात आल्याने आधीच लॉकडाऊनमुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या सामान्य जनतेला यामुळे आर्थिक फटका बसला. यामुळे लोकांमध्ये प्रचंड संताप होता. म्हणून सरकारने लॉकडाऊनच्या‌ दरम्यान वीजबिलामध्ये सवलत देण्याचे जाहीर केले ‌होते. मात्र, अजूनही ते वास्तव्यात आलेले नाही. दुसरीकडे आर्थिक कोंडी झालेल्या सर्वसामान्य जनतेला महावितरणकडून वीजबिल भरण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे.

ग्राहकांच्या म्हणण्यानुसार आत्तापर्यंत इतिहासात आलेली ही सर्वाधिक बिले आहेत. महावितरणाने ग्राहकांना त्यांचे रिडींग घेऊन ऑनलाईन अॅपद्वारे पाठवण्याची सुविधा दिली असली तरी, अनेकांना ते शक्य झाले नाही. ग्राहक मात्र, सरकारच्या आश्वासन पूर्ततेची प्रतीक्षा करत आहे. लाॅकडाऊनमध्ये दुकाने बंद होती. तरी देखील ग्राहकांना हजारो रुपये बिल आले. पण व्यवसाय सुरु करण्याशिवाय गत्यंतर नाही म्हणून, नाईलाजाने ग्राहकांनी बिले भरली. पण दुसर्‍या बाजूला रविवार कारंजा बाजारपेठेतील एका किराणा व्यापाऱ्याला याच काळामध्ये साडे तीनशे रुपये बिल आले. अशा एक ना अनेक कारणांमुळे महावितरणचा सावळा गोंधळ समोर आला आहे.