उपचारासाठी गेलेल्या महिलेचा डॉक्टरनेच केला विनयभंग!

नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील वडाळागाव येथील दवाखान्यात उपचारासाठी गेलेल्या महिलेचा डॉक्टरने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी (दि.२०) रोजी पावणेबाराच्या सुमारास फिर्यादी महिला सादिक नगर, गल्ली नं.४ वडाळागाव येथे असलेल्या दवाखान्यात गेली. पोटात दुखत असल्याचे महिलेने डॉ. मुश्ताक अहमद शेख हकीमुद्दीन (वय ४९, रा.विनयनगर, नाशिक) याला सांगितले. दरम्यान, डॉ.शेख याने इंजेक्शन देण्याच्या बहाण्याने २ वेळा महिलेच्या अंगावर झोपण्याचा प्रयत्न करून विनयभंग केला. यानंतर फैसल व शोएब हे डॉ.शेखकडे विचारणा करण्यास गेले असता, डॉक्टरने शिवीगाळ करत, हातातील कैचीने दोघांवर वार केला. अशी तक्रार महिलेच्या पतीने इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.