.. अखेर नाशिक शहरातला हा भाग आता पूर्णपणे लॉकडाऊन !

नाशिक (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील जुने नाशिक परिसर हा कोरोना हॉटस्पॉट ठरत आहे. आणि यामागचे कारण येथील दाट लोकवस्ती आहे. या परिसरातील वाढती रुग्णसंख्या बघता बुधवारी (दि.१५) हा संपूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. म्हणून आता जुन्या नाशकात केवळ अत्यावश्यक सेवाच सुरु राहणार असून इतर सर्व व्यवसाय बंद असणार आहे.

जुने नाशिक परिसरातील कुंभारवाडा, नानावली, काझीगढी, शिवाजी चौक, बागवानपुरा, कमोद गल्ली आणि बेळे गल्ली तसेच नाईकवाडीपुरा, काझीपुरा, झारकरी कोट, आझाद चौक, दूध बाजार, चव्हाटा, कोकणीपुरा, पिंझारघाट रोड, वझरे रोड, पाटील गल्ली, चौक मंडई, खडकाळी आणि भिमवाडी येथे प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले होते. परंतु त्याचाही काही हवा तसा परिणाम झाला नाही.

म्हणून जुन्या नाशकात जाणारे रस्ते आता वाह्तुकीसाठीसुद्धा बंद करण्यात आले आहेत. आता या परिसरात बॅरिकेडिंग लावण्यात येणार आहे, या क्षेत्रातील नागरिकांना विनाकारण बाहेर पडता येणार नाही, तसेच या क्षेत्रासाठी आता दिवसरात्र बंदोबस्त असणार आहे. पुढील आदेश येईपर्यंत या परिसरात लॉकडाऊन कायम असणार आहे.