मुंबई | 29 एप्रिल 2025: 1 मे 2025 पासून एटीएममधून पैसे काढण्यावर ग्राहकांना अधिक खर्च करावा लागणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अतिरिक्त एटीएम व्यवहारांसाठी शुल्क वाढवण्यास मान्यता दिली असून, त्यामुळे मोफत व्यवहार मर्यादेनंतर प्रत्येक व्यवहारावर २३ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. सध्या हे शुल्क २१ रुपये आहे.
मोफत व्यवहार मर्यादा जैसे थे:
ग्राहकांना त्यांच्या बँकेच्या एटीएममधून दरमहा ५ मोफत व्यवहार करता येणार आहेत. इतर बँकांच्या एटीएमसाठी मेट्रो शहरांमध्ये ३ आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये ५ मोफत व्यवहारांची सुविधा पूर्वीप्रमाणेच उपलब्ध राहील. या मर्यादेपेक्षा अधिक व्यवहार झाल्यास नव्याने निश्चित केलेले शुल्क लागू होईल.
लहान बँकांच्या ग्राहकांवर होणार अधिक परिणाम:
वाढलेल्या शुल्काचा सर्वाधिक परिणाम लहान बँकांच्या ग्राहकांवर होण्याची शक्यता आहे. लहान बँकांकडे मर्यादित एटीएम नेटवर्क असल्यामुळे त्यांच्या ग्राहकांना इतर बँकांचे एटीएम अधिक वेळा वापरावे लागतात. त्यामुळे मोफत व्यवहार मर्यादा लवकरच संपते आणि अधिक व्यवहारांसाठी वाढीव शुल्क भरावे लागते.
शुल्क वाढीमागील कारणे:
बँका आणि थर्ड पार्टी एटीएम सेवा प्रदात्यांनी एटीएम देखभाल व ऑपरेशन्सवरील वाढत्या खर्चाचा दाखला देत शुल्क वाढीची मागणी केली होती. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) याबाबत शिफारस केल्यानंतर RBI ने ती मान्य केली आहे. परिणामी, 1 मेपासून ही नवीन शुल्करचना लागू होणार आहे.
अतिरीक्त पैसे देणं कसं टाळता येऊ शकतं?
- फक्त मोफत व्यवहार मर्यादेतच पैसे काढा.
- आपल्या बँकेच्या एटीएमचा अधिकाधिक वापर करा.
- डिजिटल पेमेंट, UPI, मोबाईल वॉलेट यांसारखे पर्याय निवडा.