नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
NMC Notice : शंभरहून अधिक मालमत्ताधारकांना नोटीस
नाशिक (प्रतिनिधी) : महापालिकेकडून जानेवारी महिन्याच्या अखेरीस अनियमित बांधकामे शोधमोहिमेचा अहवाल सादर झाला नव्हता.
नोटीस काढल्यानंतर सिडको व नाशिक रोड या दोन विभागाचे सर्वेक्षण अहवाल नगररचना विभागाकडे सादर झाले. या दोन्ही विभागात जवळपास शंभरहून अधिक मालमत्ताधारकांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत.
महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शहरात २६ ते २९ जानेवारी या दरम्यान अनधिकृत बांधकामे शोधण्याची मोहीम हाती घेतली.
वापरातील बदल, तळघर टेरेसचा अनधिकृत वापर, अनधिकृत नळजोडणी या संदर्भात शोध घेऊन त्या मिळकती अनधिकृत ठरवून त्यांच्यावर कर लावण्याच्या सूचना दिल्या होत्या.
सहा विभागात जवळपास ३२ पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. सर्वेक्षण झाल्यानंतर चार ते पाच दिवसात अहवाल सादर करणे अपेक्षित होते. परंतु, नोडल अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारचा अहवाल सादर झाला नव्हता.
त्यामुळे शिस्तभंग कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने नाशिक रोड व सिडको या दोन विभागांची सर्वेक्षण अहवाल नगर रचना विभागाकडे सादर झाले. बेकायदा वापरात बदल केलेल्या बांधकामांना नोटीस बजावण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
दोन्ही विभागात शंभरहून अधिक अनियमित बांधकाम केलेल्या मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल यांनी दिली.
“सिडको, नाशिक रोड विभागातील अनियमित बांधकाम शोध मोहिमेचे अहवाल प्राप्त झाले आहे. त्याअनुषंगाने शंभरहून अधिक मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आली असून, येथे तपासणी केल्यानंतरच कारवाई केली जाईल.” – संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता, नगर रचना विभाग