नाशिक शहरात कोरोनारूग्णांची वाढती संख्या बघता उपाययोजना करण्यात येत आहे.
नाशिक (प्रतिनिधी): शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे, महापालिकेच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना केल्या जात आहे. रविवारी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी मुक्तिधाममधील भक्त निवासाची पाहणी केली. याठिकाणी रुग्णांसाठी व्यवस्था करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
नाशिकरोड येथील कोविड सेंटर आता फुल झाले असून बाधितांवर उपचार होण्यासाठी पर्यायी जागेची पाहणी करण्यात येत आहे. रविवारी दुपारी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी मुक्तिधाम मंदिराच्या मागे असलेल्या भक्त निवासांची पहाणी केली. यापूर्वीही या भक्तनिवासावर खर्च करण्यात आला होता. मात्र या ठिकाणी बाधितांना ठेवण्यात आले नव्हते. आता पुन्हा या ठिकाणी पहाणी करण्यात आली आहे.
भविष्यात रुग्णांची संख्या वाढत राहिल्यास त्या रुग्णांना राहण्याची व्यवस्था मनपाच्या हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेली आहे. बेड कमी पडल्यास भविष्यातील उपाययोजना म्हणून मुक्तिधाम मधील गोवर्धनभक्त निवास, अयोध्या भवन व गोकुळ भवन या तीन इमारतींची पाहणी करण्यात आली. त्या ठिकाणी मनपास आवश्यकतेनुसार रुग्णांसाठी टप्प्याटप्प्याने या इमारतीमध्ये व्यवस्था करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना जाधव यांनी दिल्या. यावेळी कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, विभागीय अधिकारी डॉ. दिलीप मेनकर, कोरोना कक्ष अधिकारी डॉ. आवेश पलोड, डॉ. जितेंद्र धनेश्वर,उपअभियंता नीलेश साळी, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी यांनी पाहणी करून मुक्तिधामचे ट्रस्टी नटवरलाल चव्हाण व जगदीश चव्हाण यांच्यासोबत चर्चा केली.