नाशिक। दि. १ ऑगस्ट २०२५: नाशिक जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाची नोंद कमी असली तरी धरणांनी मात्र सरासरी गाठल्याने पाण्याची चिंता मिटली आहे. जून महिन्यात सरासरी १७४ मिमी पाऊस होणे अपेक्षित असताना २२३ मिमी पावसाची नोंद झाली तर जुलै
महिन्यात ३०८ मिमी सरासरी पाऊस होणे अपेक्षित असताना जिल्ह्यात १९८ मिमी पावसाची नोंद झाली. मात्र दोन्ही महिन्याचा एकत्रित विचार केल्यास सरासरीपेक्षा जिल्ह्यात जास्त पाऊस झाला आहे. मागील वर्षी ३० जुलैपर्यंत जिल्ह्यात ४०३ मिमी पावसाची नोंद झाली होती, तर यंदा ४२३ मिमी पाऊस झाला आहे.
जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात सरासरी ९९३.८ मिमी इतका पाऊस जिल्ह्यात होत असतो. मात्र यंदा जून व जुलै या दोन महिन्यांत ४२३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात दोन महिन्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे ११ धरणे १०० टक्के भरले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईचे संकट दुरू झाले आहे.